बालविवाह लावून दिल्याप्रकरणी संशयित आरोपींची जामिनावर मुक्तता; ओरोस विशेष न्यायालयाचा निर्णय

बालविवाह लावून दिल्याप्रकरणी संशयित आरोपींची जामिनावर मुक्तता; ओरोस विशेष न्यायालयाचा निर्णय

*कोंकण एक्सप्रेस*

*बालविवाह लावून दिल्याप्रकरणी संशयित आरोपींची जामिनावर मुक्तता; ओरोस विशेष न्यायालयाचा निर्णय*

*आरोपींच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी काम पाहिले*

*​ओरोस ः प्रतिनिधी*

बालविवाह लावून दिल्याच्या आरोपावरून कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपी गणेश तानाजी निकम व संगीता गणेश निकम यांना मे. विशेष न्यायाधीश श्री. एस. टी. त्रिपाठी यांनी ५ ऑगस्ट २०२६ रोजी नियमित जामीन मंजूर केला आहे.
​सदर प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात (गुन्हा रजि. क्र. २५०/२०२६) भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम ६४(२) (i), ६४(२) (m), ५४, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) अधिनियम, २०१२ मधील कलम ४, ६, १७ तसेच बालविवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ मधील कलम ९, १०, ११, १७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
​प्रकरणाची पार्श्वभूमी:
फिर्यादीनुसार, पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही संशयित आरोपींनी तिचा एका विधीसंघर्षग्रस्त बालकाशी बालविवाह लावून दिला व त्यानंतर दोघांना एकत्र वास्तव्यास राहण्यास परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.
​न्यायालयात झालेला युक्तिवाद:
सुनावणीदरम्यान आरोपींच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी सविस्तर बाजू मांडली. आरोपींवर प्रत्यक्ष मुख्य गुन्ह्याचा आरोप नसून केवळ सहाय्य केल्याचा (Abetment) आरोप आहे, तसेच तपासासाठी त्यांची पुढील कोठडी आवश्यक नसल्याची बाब त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
​हा युक्तिवाद ग्राह्य धरून मे. विशेष न्यायाधीश श्री. एस. टी. त्रिपाठी साहेब यांनी आरोपी गणेश तानाजी निकम व संगीता गणेश निकम यांना प्रत्येकी ₹५०,०००/- च्या जातमुचलक्यावर आवश्यक अटी व शर्तींसह नियमित जामीन मंजूर केला.
​सदर प्रकरणात आरोपींच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी प्रमुख वकील म्हणून काम पाहिले, तर त्यांना अॅड. नामदेव मठकर, अॅड. पंकज खरवडे, अॅड. विनय विजय रजपूत, अॅड. कैस शेख व अॅड. भूषण कदम यांनी सहाय्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!