*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवलीतील जुन्या भाजी मार्केटच्या पुनर्बांधणीला वेग! अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांच्याकडून विशेष आभार*
*कणकवली ः संजना हळदिवे*
कणकवली नगरपंचायत हद्दीतील अत्यंत जीर्ण व धोकादायक बनलेल्या जुन्या भाजी मार्केट इमारतीची पुनर्बांधणी आणि पुढील प्रशासकीय कार्यवाहीबाबत नगरपंचायतीकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी (कणकवली) यांच्या ४ ऑगस्ट २०२६ च्या पत्राच्या अनुषंगाने, ५ ऑगस्ट रोजी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी अधिकृत पत्र व्यापारी मित्र मंडळ (अप्पासाहेब पटवर्धन चौक) येथे पाठवले.
सदर पत्र ज्येष्ठ व्यावसायिक भगवान कासले आणि लक्ष्मण महाडिक यांनी प्राप्त केले. त्यानंतर माऊली मित्र मंडळाचे सर्वेसर्वा व ज्येष्ठ व्यावसायिक श्री. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी सर्वांच्या अनुमतीने पत्राचे वाचन करून उपस्थितांना त्यातील माहिती दिली. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ व्यावसायिक राजेंद्र पेडणेकर यांनी मा. अप्पर जिल्हाधिकारी यांचे विशेषतः आभार मानले आहेत.
नगरपंचायतीच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे:
नगरपंचायतीच्या पत्रात (जा. क्र. कनप / न वि / १०६७ / २०२६) नमूद केल्याप्रमाणे, विद्यमान भाजी मार्केट इमारत ही अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत आहे. जागेचा काही भाग शासकीय मालकीचा असल्याने हा प्रस्ताव सक्षम प्राधिकरणाच्या (शासन स्तरावर) मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
सार्वजनिक सुरक्षिततेचा प्राधान्याने विचार करता, नवीन भाजी मार्केटच्या बांधकामाबाबतची आवश्यक ती प्रशासकीय आणि कायदेशीर कार्यवाही नगरपंचायत कार्यालयाकडून तातडीने पूर्ण केली जाणार आहे. या पत्राची प्रत सहाय्यक आयुक्त (नगरविकास शाखा, सिंधुदुर्ग) यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आली आहे.
व्यापारी बांधव व भगिनींची मोठी उपस्थिती
या प्रसंगी अप्पासाहेब पटवर्धन चौक, जुना भाजी मार्केट परिसरातील सर्व व्यावसायिक बांधव, व्यापारी मित्र मंडळाचे सदस्य आणि माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शासनाकडून व प्रशासनाकडून या विषयावर तत्परतेने होत असलेल्या सकारात्मक कारवाईमुळे व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

