*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्गच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणुकीचा क्षण..!*
*सिंधुदुर्ग बँकेत ७३ गुणवंतांना नियुक्ती; आणखी ६७ पदांची भरती लवकरच..!*
*रोजगाराच्या संधी या जिल्ह्यातच निर्माण करणार-पालकमंत्री नितेश राणे*
*सिंधुदुर्ग*
प्रतिनिधी “ही केवळ नियुक्तीपत्र वाटपाचा समारंभ नाही, तर सिंधुदुर्गच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणुकीचा क्षण आहे. गुणवत्तेच्या जोरावर मिळालेली ही नोकरी म्हणजे जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी आहे,” अशा भावनिक शब्दांत पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनियुक्त कर्मचाऱ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी, सहकार क्षेत्र, ग्रामीण अर्थचक्र आणि हजारो कुटुंबांचे जीवन या बँकेशी जोडलेले आहे. त्यामुळे प्रत्येक नव्या कर्मचाऱ्याने स्वतःला केवळ कर्मचारी न समजता जिल्ह्याच्या विकासाचा भागीदार समजून प्रामाणिकपणे काम करावे. तुमच्या निर्णयांचा आणि सेवाभावाचा थेट परिणाम जिल्ह्याच्या प्रगतीवर होणार आहे. त्यामुळे या जबाबदारीचे भान ठेवून काम करावे वा जिल्हाच्या विकासाला येथील अर्थव्यवस्थेला चालना द्यावी असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
हा केवळ नियुक्तीपत्र वितरण समारंभ नाही तर या भरतीत आपले गुणवत्ता सिद्ध केलेल्या या नियुक्त होत असलेल्या उमेदवारांचा स्वागत समारंभ आहे! फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच उमेदवारांची या भरती निवड झाली असून यात मोठे परश्याम घ्यावे लागले! पाच वर्षांपूर्वी जिल्हा बँकेची सूत्रे स्वीकारताना सर्वात मोठा संकल्प होता तो म्हणजे भरती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणणे. नोकऱ्या शिफारशी, दबाव किंवा आर्थिक व्यवहारातून नव्हे, तर केवळ गुणवत्तेच्या आधारे मिळाल्या पाहिजेत, ही भूमिका आम्ही घेतली. आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. असेही पालकमंत्री नितेश राणे म्हणाले!
ही भरती प्रक्रिया नामवंत आयबीपीएस या शासनमान्य एजन्सी मार्फत झाली आहे. कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप झाला नाही. “आज तुमच्या हातात आलेले नियुक्तीपत्र हे कोणाच्याही शिफारशीमुळे नव्हे, तर तुमच्या गुणवत्तेमुळे मिळाले आहे. त्यामुळे या विश्वासाचे रूपांतर उत्कृष्ट सेवेत करा,” असे आवाहन त्यांनी केले.
सिंधुदुर्गातील अधिकाधिक तरुणांना रोजगार मिळावा, हा आमचा ध्यास असून ही भरती इथेच थांबणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी दुसरी आणि तिसरी भरती प्रक्रियाही होणार असल्याचे सांगितले. यावेळी संधी न मिळालेल्या पात्र उमेदवारांनी निराश न होता पुढील टप्प्यांसाठी तयारी ठेवावी. जिल्ह्यात नवीन उद्योग, रोजगाराच्या संधी आणि आर्थिक विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“जिल्ह्याच्या भविष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे येथील तरुणाई. त्यांच्या हाताला काम मिळाले, तर सिंधुदुर्गचा विकास अधिक वेगाने होईल,” असे सांगत नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सेवाभाव जपत जिल्हा बँकेची विश्वासार्हता अधिक उंचावावी, असे आवाहन नितेश राणे यांनी केले.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये भरती प्रक्रिया बँकेचे कामकाज, बँकेचे विश्वासार्हता, बँकेचा विकास, व जिल्ह्यातील बँकिंग सेवेचे आदर्श जाळे याबाबत माहिती दिली. यावेळी संचालक दिलीप राव राणे, स्मिता राणे, व्हिक्टर डाँटस, ॲड प्रकाश बोडस, गजानन गावडे, समीर सावंत, रवींद्र मडगावकर आधी संचालक नवनियुक्त कर्मचारी, व त्यांचे पालक, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘राणे साहेबांचे स्वप्न…सिंधुदुर्गच्या प्रत्येक तरुणाच्या हाताला काम
यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी खासदार नारायण राणे यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख करत भावनिक शब्दांत भावना व्यक्त केल्या. “या संपूर्ण भरती प्रक्रियेमागे राणे साहेबांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि सिंधुदुर्गच्या विकासाचा दूरदृष्टीचा विचार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र तरुणाच्या हाताला रोजगार मिळावा, हे त्यांचे कायमचे स्वप्न राहिले आहे. आज ते या कार्यक्रमाला उपस्थित नसले तरी गुणवत्तेच्या आधारावर शेकडो तरुणांना रोजगार मिळताना पाहून त्यांना निश्चितच सर्वाधिक समाधान आणि आनंद झाला असता, ही भरती शेवटची नसून रोजगारनिर्मितीचा हा प्रवास पुढेही सुरू राहणार आहे. आज ७३ नियुक्त्या दिल्या आहेत, आणखी ६७ पदांची भरती होत आहे. त्यामुळे शिल्लक उमेदवारांना पुन्हा संधी मिळणार आहे. तिसरी आणि त्यानंतरही भरतीचे टप्पे राबवून अधिकाधिक स्थानिक तरुणांना संधी देण्याचा आमचा निर्धार आहे. विविध क्षेत्रात रोजगार आणून “सिंधुदुर्गचा एकही पात्र तरुण रोजगारापासून वंचित राहू नये, हा आमचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न आहे असेही पालकमंत्री नितेश राणे यांनी जाहीर केले!

