सुसज्ज भाजी मार्केटसाठी समीर नलावडेंचे महसूलमंत्र्यांना साकडे

सुसज्ज भाजी मार्केटसाठी समीर नलावडेंचे महसूलमंत्र्यांना साकडे

*कोंकण एक्सप्रेस*

*महसुलाची जागा नगरपंचायतीला द्या; माजी नगराध्यक्षांची मागणी*

*सुसज्ज भाजी मार्केटसाठी समीर नलावडेंचे महसूलमंत्र्यांना साकडे*

*कणकवली : संजना हळदिवे*

कणकवली शहरातील भाजी मार्केट अधिक सुसज्ज आणि प्रशस्त व्हावे, यासाठी आप्पासाहेब पटवर्धन चौकाजवळील जुन्या भाजी मार्केटला लागून असलेली महसूल विभागाची जागा कणकवली नगरपंचायतीला वर्ग करण्यात यावी, अशी आग्रही मागणी कणकवलीचे माजी नगराध्यक्ष श्री. समीर नलावडे यांनी राज्याचे महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
कणकवली नगरपंचायत हद्दीत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आप्पासाहेब पटवर्धन चौकात सध्या जुने भाजी मार्केट भरते. या मार्केटच्या अगदी लगत महसूल विभागाच्या मालकीची जागा (सर्व्हे नं./ हिस्सा नं. १९८ व १, क्षेत्र ०.०७) आहे. वाढती लोकसंख्या आणि व्यापाऱ्यांची तसेच ग्राहकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी एका सर्वसोयीनियुक्त, अद्ययावत भाजी मार्केटची आवश्यकता आहे. जर ही महसूल विभागाची जागा नगरपंचायतीच्या भाजी मार्केटमध्ये वर्ग करण्यात आली, तर कणकवलीकरांसाठी एक मोठे आणि सुसज्ज मार्केट उभारणे शक्य होणार आहे.
प्रशासनाकडे पाठपुरावा सुरूच:
या जागेच्या हस्तांतरणाबाबत कणकवली नगरपंचायतीच्या वतीने यापूर्वीच माननीय कोकण आयुक्त आणि सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी यांच्याशी सर्व आवश्यक पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. प्रशासकीय पातळीवर यासंदर्भात प्रक्रिया सुरू असली तरी, त्याला गती मिळणे गरजेचे आहे.
या पार्श्वभूमीवर, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या अधिकारात या प्रश्नात वैयक्तिक लक्ष घालावे आणि लवकरात लवकर योग्य निर्णय घेत सदर जागा नगरपंचायतीला वर्ग करावी, अशी विनंती समीर नलावडे यांनी ३ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात केली आहे.
ही जागा नगरपंचायतीला मिळाल्यास शहरातील वाहतूक कोंडीचा आणि भाजी विक्रेत्यांच्या जागेचा प्रश्न कायमचा सुटेल. आता या महत्त्वाच्या मागणीवर महसूल मंत्री काय निर्णय घेतात आणि ही जागा नगरपंचायतीला कधी मिळते, याकडे संपूर्ण कणकवली शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!