*कोंकण एक्सप्रेस*
*संजय गवस यांचा इशारा : दोडामार्ग तालुक्यात एम-सँड प्रकल्पांना तीव्र विरोध*
*दोडामार्ग : शुभम गवस*
दोडामार्ग तालुक्यात विविध गावांमध्ये एम-सँड (कृत्रिम वाळू) प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र विरोधाची भूमिका घेतली आहे. पर्यावरणाला बाधा पोहोचविणारे असे उद्योग तालुक्यात कोणत्याही परिस्थितीत उभे राहू देणार नाही, असा स्पष्ट इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख संजय गवस यांनी दिला आहे.
संजय गवस यांनी सांगितले की, पिकुळे, उसप, बोडदे आणि केर या गावांतील शासकीय जमिनींवर एम-सँड प्रकल्प उभारण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती स्थानिक पातळीवर समोर येत आहे. या अनुषंगाने संबंधित यंत्रणांकडून स्थळ पाहणी केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. अशा प्रकल्पांमुळे पर्यावरण, शेती, जलस्रोत आणि स्थानिक जैवविविधतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष जनतेसोबत उभा असून गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असेही गवस यांनी स्पष्ट केले. स्थळ पाहणीच्या वेळी स्थानिक नागरिकांनी जागरूक राहून आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही अशा प्रकल्पांना विरोध दर्शविताना राज्य सरकार व सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. दोडामार्ग तालुक्याच्या पर्यावरणीय संवेदनशीलतेचा विचार करून अशा प्रकल्पांना परवानगी देऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.
तालुक्यात पर्यावरणाला बाधा पोहोचविणारे प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

