*कोंकण एक्सप्रेस*
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त*
*आणि स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम*
*’छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत ३१ जुलैला सिंधुदुर्गातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांत भव्य शिबिरे*
*नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे*
*सिंधुदुर्ग*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य शासनाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राज्यभर राबविण्यात येत असून, या अभियानाला २२ जुलैपासून प्रारंभ झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ, विविध प्रमाणपत्रे, लोकसेवा हक्कांतर्गत सेवा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात या अभियानाचा शुभारंभ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आयोजित विशेष आरोग्य तपासणी व आरोग्य शिबिरातून करण्यात आला. नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देतानाच विविध शासकीय योजनांची माहिती आणि लाभ देण्याचीही व्यवस्था यावेळी करण्यात आली.
प्रशासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. समाजातील तळागाळातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ जलद आणि प्रभावीपणे पोहोचविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
२२ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत महसूल, आरोग्य, पोलीस, महिला व बालविकास, कृषी, वन, पर्यटन, भूमी अभिलेख, पशुसंवर्धन व दुग्धविकास, समाजकल्याण, नगरविकास, ग्रामविकास, परिवहन आदी विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे. याशिवाय महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत मिळणाऱ्या विविध सेवाही संबंधित विभागांकडून नागरिकांना शिबिरातच उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये ३१ जुलै २०२६ रोजी या अभियानांतर्गत भव्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांना जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर आणि कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे हे आपल्या-आपल्या मतदारसंघात उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी भगवती मंगल कार्यालय, कणकवली, कुडाळ विधानसभा मतदारसंघासाठी महालक्ष्मी हॉल, कुडाळ, तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी बॅरिस्टर नाथ पै सभागृह, नगरपरिषद सावंतवाडी येथे शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिक, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, युवक तसेच गरजू लाभार्थ्यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातील ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानात’ मोठ्या संख्येने सहभागी होऊन विविध शासकीय योजना, सेवा आणि सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

