दशावतारी कलाकारांना शासन दरबारी हक्काचा न्याय

दशावतारी कलाकारांना शासन दरबारी हक्काचा न्याय

*कोंकण एक्सप्रेस*

*दशावतारी कलाकारांना शासन दरबारी हक्काचा न्याय*

*नोंदणीसाठी मंत्रालयाचे अधिकारी सिंधुदुर्गात दाखल*

* सिंधुदुर्ग ; प्रतिनिधी*

आमदार निलेश राणे यांनी राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी कलाकारांची अधिकृत नोंदणी करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. या उपक्रमामुळे दशावतार कलाकारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना व सवलतींचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
सिंधुदुर्गातील एकही दशावतार कलाकार शासनाच्या लाभापासून वंचित राहू नये, तसेच ऑनलाइन नोंदणीतील अडचणींमुळे कोणाचाही हक्क हिरावला जाऊ नये, यासाठी मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जिल्ह्यात येऊन नोंदणी प्रक्रिया राबवावी, अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात सभागृहात प्रभावीपणे मांडली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत सांस्कृतिक कार्य विभागाने अधिकाऱ्यांचे पथक सिंधुदुर्गात पाठविले आहे.
हे अधिकारी पुढील काही दिवस जिल्ह्यात मुक्काम करून प्रत्येक तालुक्यात जाऊन दशावतार कलाकारांच्या प्रत्यक्ष भेटी घेणार असून, त्यांची माहिती संकलित करून अधिकृत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. या प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील कलाकारांची शासन स्तरावर अधिकृत नोंद होऊन त्यांना भविष्यात विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
सिंधुदुर्गात दाखल झालेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे स्वागत केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, देवेंद्र नाईक, अरविंद करलकर तसेच शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!