*कोंकण एक्सप्रेस*
*’आम्ही आमच्याच घरात सुरक्षित आहोत की नाही?’; स्मार्ट मीटर आणि सेटअप बॉक्सच्या सुरक्षेवरून राजेंद्र पेडणेकर यांचा संतप्त सवाल*
*सिंधुदुर्ग / प्रतिनिधी:*
“स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या घरात एक प्रकारे पाळत ठेवली जात आहे का? जर प्रत्येक उपकरणात कॅमेरा आणि इंडिकेटर असणार असेल, तर आम्ही आमच्याच घरात सुरक्षित आहोत की नाही?” असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. वाढत्या तंत्रज्ञानाच्या नावाखाली नागरिकांच्या गोपनीयतेचा संकोच होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
स्मार्ट मीटर म्हणजे काय?
सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या स्मार्ट मीटरवर बोलताना पेडणेकर म्हणाले की, “स्मार्ट मीटर म्हणजे दुसरे काही नसून आधी रिचार्ज करा आणि मगच वीज वापरा, अशी पद्धत आहे. जसे मोबाईलचे रिचार्ज संपले की सेवा बंद होते, तसेच या मीटरचे रिचार्ज संपले की घरातील विद्युत पुरवठा थेट खंडित होणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.”
घरातील सेटअप बॉक्स सुरक्षित आहेत का?
स्मार्ट मीटरला कॅमेरा असल्याच्या चर्चांवर आक्षेप घेत त्यांनी थेट घरातील सेटअप बॉक्सच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पेडणेकर म्हणाले,
”स्मार्ट मीटरला कॅमेरा आहे असे म्हटले जाते. जर हाच नियम लावला, तर आज महाराष्ट्रातील घराघरांमध्ये स्मार्ट कार्ड असलेले सेटअप बॉक्स बसवले गेले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या सेटअप बॉक्सलाही इंडिकेटर (दिवे/सेन्सर) असतात. मग आम्ही जे घराघरात स्मार्ट कार्डवाले सेटअप बॉक्स बसवले आहेत, ते सुरक्षित आहेत का?”
’आम्ही खरोखर स्वतंत्र आहोत का?’
या गंभीर विषयावर प्रत्येक नागरिकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, “जर आपल्याच घरात आपल्या गोपनीयतेची शाश्वती नसेल, तर आपण खरोखरच स्वतंत्र आहोत का? हा विचार आज प्रत्येक नागरिकाने करण्याची तीव्र आवश्यकता निर्माण झाली आहे.” तंत्रज्ञानाच्या नावाखाली जनतेच्या खाजगी आयुष्यात होणारी ही ढवळाढवळ थांबली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली

