*कोंकण एक्सप्रेस*
*सेवाभावी व्यक्तिमत्वे प्रशासनातील खरे आधारस्तंभ: श्री अजयराज वराडकर*
*वराडकर हायस्कूलचे ज्येष्ठ लिपिक जयवंत पेडणेकर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न*
*कट्टा (प्रतिनिधी):*
“आजच्या युगात सेवाभाव अत्यंत महत्त्वाचा ठरतो आहे. प्रशासनात अशा सेवाभावी मूल्यांची भूमिका मोलाची असून, अशी सेवाभावी व्यक्तिमत्वेच प्रशासनातील खरे आधारस्तंभ व मार्गदर्शक असतात. त्यांच्या बहुमोल सल्ल्यामुळे प्रशासन गतिमान होते. त्यामुळे आजच्या काळात अशी सेवाभावी व्यक्तिमत्वे निर्माण होणे ही काळाची गरज आहे,” असे गौरव उद्गार श्री अजयराज वराडकर यांनी काढले.
वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ लिपिक श्री. जयवंत भाऊ पेडणेकर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या औचित्याने कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या व प्रशालेच्या वतीने सौ. व श्री. जयवंत पेडणेकर यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
कार्यतत्परतेचे कौतुक आणि जुन्या आठवणींना उजाळा
याप्रसंगी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. सुनील नाईक यांनी श्री. पेडणेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेताना, संस्था, शाळा आणि प्रशासन या सर्व स्तरांवरील त्यांच्या कार्यतत्परतेची विशेष प्रशंसा केली.
शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगावचे माजी अध्यक्ष श्री. प्रमोद रवींद्र धुरी आणि शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावचे मुख्याध्यापक श्री. ताकीलदार यांनी आपले जुने सहकारी श्री. पेडणेकर यांच्यासोबत असणारा जिव्हाळा आणि त्यांच्या प्रशासकीय कार्याबद्दलचे जुने अनुभव मनोगतातून व्यक्त केले.
दिग्गजांची उपस्थिती आणि शुभेच्छा
या सोहळ्यात क.पं.शि.प्र. मंडळाचे सहसचिव श्री. एस. डी. गावडे, डॉ. दादासाहेब कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. ध्वजेंद्र मिराशी, पर्यवेक्षक श्री. महेश भाट, सुप्रिया नाईक, श्री. एकनाथ राऊळ, श्री. विद्यानंद पिळणकर आणि श्री. सुनील पाटकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करून पेडणेकर यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी धनंजय गावडे यांनी मांडले, तर सूत्रसंचालन कलाशिक्षक श्री. समीर अशोक चांदरकर यांनी आपल्या बहारदार शैलीत केले.
शिक्षणप्रेमींची मोठी उपस्थिती
या कृतज्ञता सोहळ्याला क.पं.शि.प्र. मंडळ स्कूल कमिटीचे चेअरमन श्री. सुधीर वराडकर, खजिनदार श्री. रवींद्र पावसकर, संचालक महेश वाईरकर, सौ. स्वाती वराडकर उपस्थित होते. तसेच वराडकर इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक श्री. ऋषी नाईक, साळगाव प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री. नार्वेकर सर, बागेवाडी सर, माजी मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत पंडित, लिपिक श्री. सावंत यांच्यासह वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षणप्रेमी, हितचिंतक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

