*कोंकण एक्सप्रेस*
*जलजीवन मिशनची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करा; पाणीटंचाई निवारणासाठी सतर्क राहण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश*
*सिंधुदुर्गातील जलजीवन मिशन व पाणीटंचाई उपाययोजनांचा मंत्रालयात आढावा*
*मुंबई, दि. ०२ जून* :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांचा तसेच पाणीटंचाई निवारणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती, प्रलंबित कामांची प्रगती आणि पाणीटंचाईग्रस्त भागांतील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
मान्सून आगमनास विलंब होत असल्याने जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या परिस्थितीवर प्रशासनाने बारकाईने लक्ष ठेवावे, असे निर्देश देताना त्यांनी सांगितले की, पाणीटंचाईबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच नव्याने मंजूर करण्यात आलेल्या विंधन विहिरींची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
केंद्र शासनाकडून जलजीवन मिशनसाठी निधी उपलब्ध होणार असल्याचे नमूद करताना पालकमंत्र्यांनी प्राप्त निधीचे योग्य नियोजन करून रखडलेल्या योजनांना गती देण्याच्या सूचना केल्या. मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार ७६ ते ९९ टक्के प्रगती झालेल्या योजनांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून अशा सर्व योजनांची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंते व अन्य अधिकारी-कर्मचारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

