*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवलीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई**
*१ लाख ३६ हजारांची गोवा बनावटीची दारू जप्त, दोघांवर गुन्हा दाखल*
*पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या आदेशान्वये फोंडाघाट येथे एलसीबीचा छापा*
*कणकवली: प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) कणकवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. फोंडाघाट येथील हवेलीनगर भागात टाकलेल्या छाप्यात तब्बल १ लाख ३६ हजार ५०० रुपये किमतीची बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलिसांनी प्रसाद महादेव नराम (वय ५२ वर्षे, रा. हवेलीनगर, फोंडाघाट, ता. कणकवली) आणि बंटी सावंत (वय ३५ वर्षे, रा. कणकवली) या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
घराच्या पाठीमागे सुरू होती साठवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १६ जुलै २०२६ रोजी संध्याकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने फोंडाघाट येथील हवेलीनगर भागात संशयित आरोपीच्या घराच्या मागील बाजूस छापा टाकला. या छाप्यादरम्यान पोलिसांना गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा मिळून आला. जप्त करण्यात आलेल्या या मुद्देमालाची एकूण किंमत १,३६,५००/- रुपये आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
सदरची धडक कारवाई सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक मा. कु. नयोमी साटम यांच्या आदेशान्वये व सूचनेनुसार करण्यात आली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार राजेंद्र जामसंडेकर, पोलीस हवालदार (बकल नंबर ५७७) आशिष गंगावणे (बकल नंबर ७२२) आणि ज्ञानेश्वर तवटे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

