*कोंकण एक्सप्रेस*
*बारावीच्या आय. एस. सी. दिल्ली बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यालयातील दहा विद्यार्थ्यांचा रिझल्टच अद्याप लागला नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड*
* या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी-ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक*
*कणकवली : प्रतिनिधि*
कणकवली तालुक्यातील हुमरठ येथे सुरू असलेल्या बी.एन.विजयकर इंटरनॅशनल स्कूलमधील यावर्षीचा झालेल्या बारावीच्या आय. एस. सी. दिल्ली बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यालयातील दहा विद्यार्थ्यांचा रिझल्टच अद्याप लागला नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. रिझल्ट लागून एक महिना उलटला तरी अद्यापही आय. एस. सी. बोर्ड दिल्लीच्या वेबसाईटवर या दहाही विद्यार्थ्यांचा निकाल दिसत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांच्या पालकांनी संस्था चालकांकडे केली आहे. मात्र संस्थाचालक कोणत्याही प्रकारचे लेखी उत्तर देत नसल्याने त्या दहा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष फुकट जाणार असून त्याला जबाबदार कोण? त्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबद्दल पालकांनी ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेकडे लेखी निवेदनाद्वारे याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेने हा प्रश्न धसास लावून त्या दहा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष, कणकवली तहसीलदार, शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. तरी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी याप्रकरणी तातडीने लक्ष घालून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी केली आहे.
बी.एन.विजयकर इंटरनॅशनल स्कूलमधील यावर्षी बारावीच्या आय. एस. सी. दिल्ली बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यालयातील दहा विद्यार्थ्यांचा रिझल्ट ३० एप्रिल रोजी लागलाय परंतु अजून पर्यंत त्यांचा रिझल्ट लागून एक महिना होत आला तरी अद्याप विद्यार्थ्यांना रिझल्ट मिळालेला नाही. बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या या विद्यालयाच्या दहा विद्यार्थ्यांचा परिक्षेचा रिझल्ट प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे. मात्र कोणत्या कारणाने प्रलंबित ठेवण्यात आला आहे याचे कारण पालकांनी संस्था चालकांना विचारले असता विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेत लिहिलेली उत्तरे सारखीच असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बोर्डाने फेर परिक्षा घेण्यास सांगितले आहे. बोर्डाने हा निर्णय कशाच्या आधारावर घेतला आहे. तसेच कोणते पुरावे जमा केले आहेत त्या प्रश्नांला समर्थ उत्तर मिळालेले नाही. त्याचबरोबर निकाल विलंबाचे लेखी परिपत्रक संस्थेने अद्याप काढलेले नाही. फक्त पालकांना तोंडी सांगितले जात आहे. गुणपत्रक मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना बसता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
या सर्वांत धक्कादायक प्रकार असा की, या विद्यालयात बारावीच्या परीक्षेला बसलेल्या दहा विद्यार्थ्यांचा अद्यापही निकालच लावलेला नसतानाही त्यांच्या पालकांना कोणतेही ठोस लेखी उत्तर देण्यात आलेले नाही. मात्र त्या अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना फेर परिक्षा देण्याचा सल्ला संबंधित संस्थेच्या ट्रस्टी अमृता रेडकर यांच्या कडून देण्यात आला आहे. म्हणजेच त्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५४५०/- रुपयांचा आणखीनच भुर्दंड सोसावा लागणार आहे. परंतु पालक या गोष्टीला तयार नाहीत.
याबाबत ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक व संघटनेचे सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा समन्वय प्रणय बांदिवडेकर यांनी बी. एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूलचे सेक्रेटरी विवेक विजयकर यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे या संपूर्ण प्रकरणाची आठ दिवसांत लेखी माहिती देण्यास सांगितले आहे. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक किशोर ठाकरे, कालिदास परब, सौ.परब, सौ.श्रुती सावंत, सौ.देवळेकर, सौ. उमा पवार, पार्थ पवार आदी पालकांनी उपस्थित होते.
ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक व संघटनेचे सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा समन्वय प्रणय बांदिवडेकर यांनी बी. एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूलचे सेक्रेटरी विवेक विजयकर यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे या प्रकरणी माहिती देण्यासाठी पत्र देण्यात आले. याप्रसंगी पालक उपस्थित होते.

