*कोंकण एक्सप्रेस*
*साळशी येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*होम मिनिस्टर विजेत्या स्नेहल प्रशांत गावकर*
*रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन*
*शिरगाव / संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील साळशी येथील श्री देव वशिक तळखंबा मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या २५ व्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त कसबा साळशी लाडगांवकर उत्कर्ष मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त १५ मे ते १७ मे या कालावधीत सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावर्षी प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात नवजीवन ब्लड सेंटर, कणकवली यांच्या सहकार्याने १४ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.यामध्ये महिलांचा सहभाग मोठा होता.“रक्तदान हेच श्रेष्ठदान” हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे युवकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण झाली. या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून विशेष कौतुक करण्यात आले.
तसेच आयोजित मोफत आरोग्य शिबिरात मधुमेह, ब्लड प्रेशर आणि हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. या शिबिरात गावातील सुमारे ५६ नागरिकांनी सहभाग घेतला. साळशी येथील डॉ. पी. डब्ल्यू. शेळके तसेच नवोदित डॉ. साक्षी साळसकर यांनी आरोग्य शिबिरासाठी सहकार्य केले.

याशिवाय लहान मुलांसाठी क्रीडा स्पर्धा, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व “होम मिनिस्टर” स्पर्धा, दहावी-बारावी परीक्षेत विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या “होम मिनिस्टर स्पर्धा २०२६” स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये पैठणी विजेत्या म्हणून सौ. स्नेहल प्रशांत गावकर यांनी मान पटकावला. तर सेमी पैठणी विजेत्या म्हणून सौ. एकता संदीप गावकर, सौ. वर्षा नितीन लाड, सौ. मेघा मुरलीधर लाड आणि सौ. मंजिरी सुशील गावकर यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विविध खेळ व सांस्कृतिक उपक्रमांमुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. स्पर्धेत सहभागी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाची रंगत वाढविली.
धार्मिक कार्यक्रमासोबत सामाजिक उपक्रमांची सांगड घालत मंडळाने समाजापुढे आदर्श निर्माण केल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. महापूजेसाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कसबा साळशी लाडगांवकर उत्कर्ष मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

