तोरसोळे येथे पावणाई ईटलाई मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात

तोरसोळे येथे पावणाई ईटलाई मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात

*कोंकण एक्सप्रेस*

*तोरसोळे येथे पावणाई ईटलाई मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात*

*मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यास भाविकांची अभूतपूर्व गर्दी*

*शिरगाव / संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील तोरसोळे येथील ग्रामदैवत श्रीदेवी पावणाई ईटलाई मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त आयोजित करण्यात आलेला मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ६ ते ८ मे या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी गर्दी केली होती. संपूर्ण परिसर देवीच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
सोहळ्याची सुरुवात वेदमूर्तींच्या मंत्रोच्चारात पारंपरिक धार्मिक विधींनी करण्यात आली. अग्निस्थापना, वास्तुपुरुष पूजन, मूर्तीचा जननिवास, देवी स्थापना तसेच मूर्ती प्राणप्रतिष्ठा विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले. मंदिराच्या शिखरावर कलशारोहण होताच उपस्थित भाविकांनी जल्लोष करत देवीच्या नावाचा जयघोष केला. त्या वेळी संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते.
सोहळ्यानिमित्त गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोलपथकाच्या दणदणाटात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात भक्तांनी उत्साहाने सहभाग घेतला. महिलांनी फुगड्या, ओव्या आणि पारंपरिक गीतांद्वारे धार्मिक उत्सवात रंगत आणली. मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि पारंपरिक तोरणांनी सजविण्यात आला होता.


तीन दिवसीय सोहळ्यात हरिपाठ, भजन, कीर्तन, धार्मिक गायन तसेच भजनांचा जंगी सामना यांसारख्या कार्यक्रमांनी भक्तांची मने जिंकली. विविध भजनी मंडळांनी देवीच्या भक्तिगीतांनी वातावरण भक्तिरसात रंगविले. कीर्तनकारांनी अध्यात्म, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमालाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच देवीची महापूजा, महाआरती आणि महाप्रसाद कार्यक्रमात हजारो भाविकांनी सहभागी होत देवीचे दर्शन घेतले. महाप्रसादाचा लाभ घेताना भक्तांमध्ये समाधान आणि भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळाले.
मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ग्रामस्थ, देवस्थान समिती, मुंबईस्थित चाकरमानी तसेच भाविकांनी मोठे योगदान दिले. सर्वांच्या सहकार्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार भव्य स्वरूपात पूर्ण झाल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
हा धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी श्रीदेवी पावणाई ईटलाई ग्रामस्थ मंडळ, तोरसोळे-राणेवाडी, श्री पावणाई देवी सेवा मंडळ मुंबई (रजि.), ग्रामस्थ, युवक मंडळे तसेच महिला मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!