भ्रष्टाचारी शिक्षणाधिकारी कविता शिंपींना हजर करून घेतल्यास जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन!

भ्रष्टाचारी शिक्षणाधिकारी कविता शिंपींना हजर करून घेतल्यास जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन!

*कोंकण एक्सप्रेस*

*भ्रष्टाचारी शिक्षणाधिकारी कविता शिंपींना हजर करून घेतल्यास जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन!*

​*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा थेट इशारा; उपसचिव मो. बा. ताशिलदार यांच्यावरही गंभीर आरोप*

*सिंधुदुर्ग*

वैभववाडीतील एका गरीब विधवा महिलेला आपले मंगळसूत्र गहाण ठेवून शिक्षक मान्यतेसाठी पैसे देण्यास भाग पाडणाऱ्या वादग्रस्त माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. शिक्षण उपसचिव मो. बा. ताशिलदार यांनी कविता शिंपी यांना ‘क्लीन चिट’ देत त्यांना पुन्हा चुकीच्या पद्धतीने हजर करून घेण्याचे आदेश काढले आहेत. हा आदेश तत्काळ रद्द करावा, अन्यथा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसमोर तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा आक्रमक इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने दिला आहे. यासंदर्भात संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, सचिव नंदन घोगळे आणि कोकण कार्याध्यक्ष सलिम तकीलदार यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रविंद्र खेबुडकर यांना जाहीर आंदोलनाची नोटीस व निवेदन दिले आहे.
​मंत्रालयातील उपसचिवांकडून मॅनेज’गिरी
ताशिलदार यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे.
​माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांची चौकशी सुरू होती आणि त्या रजेवर गेल्या होत्या. चौकशी अहवालात त्या दोषी आढळल्याचा अहवाल सादर झालेला असतानाही, मंत्रालयातील शिक्षण उपसचिव मो. बा. ताशिलदार यांनी १२ मे २०२६ रोजी पत्र काढून शिंपी यांना पुन्हा हजर करून घेण्याचे आदेश दिले. उपसचिव ताशिलदार यांनी लाखो रुपयांचा व्यवहार करून हे प्रकरण ‘मॅनेज’ केले आहे, असा थेट व गंभीर आरोप शिक्षक परिषदेने केला आहे. एका विधवेचे मंगळसूत्र विकायला लावणारी भ्रष्ट अधिकारी उपसचिवांना दिसत नाही का? असा सवाल उपस्थित करत, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांनी उपसचिव ताशिलदार यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.
​आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,आमदार निरंजन डावखरे,वेणूनाथ कडू यांनी उठवला होता आवाज
​कविता शिंपी यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेच्या वरिष्ठ सभागृहात हक्कभंगाची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीत दोषी आढळलेल्या अधिकाऱ्याला अचानक हजर करण्याचे आदेश देऊन उपसचिवांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. शासन आणि शिक्षक संघटनांमध्ये संघर्षाची ठिणगी टाकून सिंधुदुर्गातील शैक्षणिक वातावरण दूषित करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
​शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मंत्रालयासमोर आंदोलन छेडणार!
“जर ताशिलदार यांच्यासारखे भ्रष्टाचारी अधिकारी शिक्षण विभागाला लाभत असतील, तर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद थेट मंत्रालयाच्या शिक्षण विभागासमोर राज्यव्यापी जनआंदोलन छेडेल. या आंदोलनामुळे शिक्षण क्षेत्रातील कामकाजावर काही परिणाम झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षणमंत्री दादा भुसे साहेब यांच्यावर असेल,” असा थेट इशारा शिक्षक परिषदेने दिला आहे.​मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत हजर करून घेवू नये अशी मागणी केली आहे.​शिक्षकांच्या भावनांशी खेळणारा हा नवीन आदेश प्रशासनातील पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचारी कविता शिंपी यांना जिल्हा परिषदेत हजर करून घेऊ नये. जर त्यांना हजर करून घेतले, तर जनमाणसांत तीव्र असंतोष निर्माण होईल आणी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन उभे केले जाईल.असे जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, सचिव नंदन घोगळे व सलिम तकीलदार यांनी दिलेल्या निवेदनात ठामपणे म्हटले आहे. या निवेदनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.या संदर्भातील निवेदन जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत,उपाध्यक्ष दादा साईल आणी शिक्षण आणी आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांना पण देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.या वेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर,कोकण कार्याध्यक्ष सलिम तकिलदार, सचिव नंदन घोगळे, देवगड तालुकाध्यक्ष भिमराव येडगे,जिल्हा उपाध्यक्ष संजय राठोड, योगेश पांचाळ,सुरेखा शिंदे, तावडे,किशोर सोन्सुरकर,फर्जद सर,जाधव सर,वेरलकर सर,पारकर सर,गीरी सर आदी कार्यकर्ते उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!