*कोंकण एक्सप्रेस*
*शिरगाव हायस्कूलच्या सन १९८९-९० बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात*
*शाळा नूतनीकरणासाठी माजी विद्यार्थ्यांकडून १ लाख रुपयांचा निधी सुपूर्त*
*शिरगाव / संतोष साळसकर*
शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिरगाव येथे एस.एस.सी. बॅच सन १९८९-९० चा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण आणि भावूक वातावरणात संपन्न झाला.
सुमारे ३५ वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या मातृसंस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी शाळा इमारत नूतनीकरणासाठी १ लाख रुपयांचा मदत निधी सुपूर्त करण्यात आला.
वर्गातील आठवणी, शिक्षकांचा धाक, मित्रांसोबतचे क्षण आणि शालेय जीवनातील गमती-जमतींमध्ये दिवस कसा निघून गेला हे कळलंच नाही. “शाळेच्या प्रगतीसाठी आपलाही हातभार लागावा,” या भावनेतून विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला.
या वेळी जमा करण्यात आलेला १ लाख रुपयांचा धनादेश संस्थेचे चेअरमन विजयकुमार कदम सर व अधीक्षक संदीप साटम यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
या कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक व्ही. बी. ऐनपुरे सर, विजय वळंजू सर, आर. एम. साटम सर, चंद्रशेखर आचरेकर सर, व्ही. डी. लब्दे सर तसेच वरिष्ठ लिपिक दिलीप पाळेकर, एकनाथ साटम व प्रवीण शेट्ये यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष गणपत तावडे, मानद अधीक्षक संदीप साटम आणि सहदेव लोके उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता पुन्हा भेटण्याच्या आश्वासनाने आणि भावूक वातावरणात झाली.

