डॉ. आंबेडकर स्मारक उभाण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार -माजी मंत्री भाई गिरकर यांची ग्वाही

डॉ. आंबेडकर स्मारक उभाण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार -माजी मंत्री भाई गिरकर यांची ग्वाही

*कोंकण एक्सप्रेस*

*डॉ. आंबेडकर स्मारक उभाण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार -माजी मंत्री भाई गिरकर यांची ग्वाही*

*कणकवलीत सिंपन प्रतिष्ठानचा परिवर्तन दिन अभिवादन व सिंपन पुरस्कार प्रदान सोहळा*

*कणकवली : संजना हळदिवे*

बौद्ध समाजातील नेतेमंडळींनी उच्चवर्णीय यांनी दलित समाजावर अन्याय, अत्याचार केला होता, हे आता सांगणे बंद केले पाहिजे. कारण बौद्ध समाजबांधवांनी तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे क्षमा, करूण, शीलता हे तत्वज्ञान आत्मसात केले आहे. हे तत्त्वज्ञान बौद्ध बांधवांनी इतर समाजाला समजून सांगितले पाहिजे. सिंपन प्रतिष्ठानच्या माध्यमातून जानवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व संशोधन केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. यासाठी प्रतिष्ठानला मी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह््यातील बौद्ध बांधवांनी एकसंध होऊन समाजाची उन्नती व प्रगती करावी, असे आवाहन माजी समाजकल्याण मंत्री विजय उर्फ भाई गिरकर यांनी केले.
संपन प्रतिष्ठानतर्फे येथील मराठा मंडळ येथे परिवर्तन दिन अभिवादन व सिंपन पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला होता. या प्रसंगी श्री. गिरकर बोलत होते. यावेळी व्यापीठावर सिंपनचे अध्यक्ष अनिल तांबे, सरचिटणीस बाळकृष्ण जाधव, कार्याध्यक्ष डॉ. संदीप कदम, खजिनदार दत्ता पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. गिरकर म्हणाले, तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान महान आहेत. त्यांचे तत्वज्ञान बौद्ध समाजबांधवांनी आत्मसात केले पाहिजे. क्षमा, करुणा, शिलता हे तत्वज्ञान बौद्ध बांधवांनी इतर समाजाला समजून सांगितले पाहिजे. गिर्ये येथे गिरकर कुटुंबीयांनी स्वत:च्या खर्चातून बौद्ध विहार उभे केले आहे. याठिकाणी दररोज भगवान गौतम बौद्ध यांची पूजापाठ व पठण केले जाते. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह््यातील बहुतांशी बौद्ध विहार बंद असल्याने त्याठिकाणी भगवान गौतम बौद्ध यांची पूजापाठ व पठण होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
सिंपन प्रतिष्ठानच्या माध्यमातून जानवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व संशोधन केंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील वर्षी केंद्र उभारणीचे भूमिपूजन झाले पाहिजे, असा संकल्प बौद्ध बांधवांनी केले पाहिजे. त्यानंतर हे केंद्र उभारण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले.या केंद्र उभारणीसाठी माझ्या परीने मी सहकार्य करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह््यातील दलित बांधवांचे बौद्ध धर्मांतर झालेले नाही. त्यामुळे त्यांना अद्यापही अपृश्यतेची झळ बसत आहे. त्यामुळे त्यांना बौद्ध धर्मांतर करण्यासाठी समाजबांधवांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अनिल तांबे म्हणाले, १४ मे १९३८ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सिंधुदुर्ग जिल्ह््याला चरण स्पर्श झाले. हा ऐतिहासिक परिवर्तन दिन आहे. हा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह््यातील आंबेडकरांच्या अनुययांनी हा दिन मोठ्या थाटामाटात साजरा करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अ‍ॅड. संदीप कदम म्हणाले, १४ मे १९३८ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सिंधुदुर्ग जिल्ह््याला चरण स्पर्श झाले. त्यांच्या आगमनाने बहुजन समाजाला संजीवनी मिळाली. डॉ. आंबेडकर यांच्या परितर्वन विचारांना उजाळाला देण्यासाठी दरवर्षी सिंपन प्रतिष्ठान परिवर्तन दिन साजरा करीत आहे. सिंपन प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. जानवली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व संशोधन केंद्र उभारण्यासाठी बौद्ध बांधवांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्तविकेत बाळकृष्ण जाधव यांनी सिंपन प्रतिष्ठान स्थापन करण्यामागील उद्देश सांगून डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभे राहण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन केले.
स्मृतीशेष प्रा. रमाकांत यादव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणार सिंपन जीवन गौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते एस. एस. मुंबकर यांना जाहीर झाला होता. हा पुरस्कार श्री. गिरकर यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारला. स्मृतीशेष प्रा. विजय जामसंडेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा सिंपन विजयी भव युवा पुरस्कार खातनाम शिल्पकार रोहन पवार यांना श्री. गिरकर यांनी प्रदान केले. सिंपन अमृत पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण चौकेकर, सिंपन विशेष सन्मान पुरस्कार जानवली सरपंच अजित पवार, ख्यातनाम चित्रकार नामानंद मोडक, प्रथमेश पडवळ, वाय. डी. सावंत, अशोक कदम, संदीप कदम यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सिंपन विशेष पुरस्कार वेदात तांबे, सरिता कदम यांना प्रदान करण्यात आला. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. वर्षा कदम यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
संविधान कोणाही बदलू शकणार नाही ! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान एवढे घट्ट आहे. त्यामुळे संविधान बदलण्याची धमक कोणत्याही राजकीय पक्षांमध्ये नाही. सत्तेच्या जोरावर कोणत्याही राजकीय पक्षांनी संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे प्रयत्न डॉ. बाबासाहेबांचा पाईक म्हणून मी हाणून पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही. कारण मी एक पँथर आहे, असे माजी मंत्री विजय उर्फ भाई गिरकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!