*कोंकण एक्सप्रेस*
*उसपमधील मधलीवाडी–पैलाडवाडी रस्ता खुला करण्यासाठी सुरेश गवस यांचे आमरण उपोषण; प्रशासनाला दिला इशारा..*
*दोडामार्ग, :शुभम गवस*
दोडामार्ग तालुक्यातील मौजे उसप येथील मधलीवाडी ते पैलाडवाडी दरम्यानचा महत्त्वाचा रस्ता काही व्यक्तींनी बेकायदेशीर बांधकाम करून बंद केल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, रस्ता तात्काळ खुला करण्यात यावा या मागणीसाठी सुरेश विष्णू गवस यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
यापूर्वी २३ मार्च २०२६ रोजीही सुरेश गवस यांनी याच मागणीसाठी उपोषण केले होते. त्यावेळी तत्कालीन तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच पंचायत समिती सभापती यांनी संबंधित रस्ता सर्वेक्षण करून लवकरात लवकर खुला करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही रस्ता खुला न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यामुळे सुरेश गवस यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू करत प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा उद्भवणाऱ्या कोणत्याही अनुचित घटनेस संबंधित विभाग जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी माजी सरपंच दिनेश नाईक, माजी उपसभापती लक्ष्मण नाईक, सुनील गवस, निलेश नाईक, रोकेश गवस, पांडुरंग गवस यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने रस्ता खुला करण्याची मागणी केली आहे.

