*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील आयसीयूचे आश्वासन हवेतच.!*
*नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.!*
*कणकवली ः संजना हळदिवे*
कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, आयसीयू सुरू करणार असल्याचे आश्वासन बैठकीत देण्यात आले होते. यावेळी संबंधितांनी उद्याच करून घेतो असे आश्वासित केले होते. परंतु घोषणांपलीकडे प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली नाहीय. नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी बैठक घेऊन विविध मागण्या आणि सूचना मांडल्या, मात्र प्रशासनाने त्याकडे अक्षरशः केराची टोपली दाखवली आहे.
अपघातग्रस्त, गंभीर रुग्ण तसेच अतिदक्षता उपचारांची गरज असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू सुविधा अत्यंत आवश्यक मानली जात असतानाही कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ही सेवा अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे गंभीर रुग्णांना सिंधुदुर्गाबाहेर किंवा खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून सर्वसामान्यांवर आर्थिक भार वाढत आहे.
दरम्यान, डॉ. विशाल रेड्डी यांची कणकवली उपजिल्हा रुग्णालयात बदली करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली होती. रुग्णालयातील वैद्यकीय सेवा सक्षम करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले होते. मात्र या मागणीकडेही आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले आहे.
याशिवाय, उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ पद रिक्त असल्याने महिला रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हे पद तातडीने भरण्याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात अजूनही पद रिक्तच असल्याने प्रशासनाच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ (गायनॅकॉलॉजिस्ट) उपलब्ध असून त्या ठिकाणी रुग्णसंख्या तुलनेने कमी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्या ठिकाणांपैकी एका डॉक्टरची नियुक्ती कणकवली उपजिल्हा रुग्णालयात केल्यास रखडलेली सेवा तातडीने सुरू होऊ शकते.
कणकवलीसारख्या महत्त्वाच्या शहरातील उपजिल्हा रुग्णालयात मूलभूत आरोग्य सुविधाच अपुऱ्या राहिल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत असून, जिल्हा शल्यचिकित्सक आणि आरोग्य विभागाने तातडीने आवश्यक निर्णय घ्यावेत, अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे.

