*कोंकण एक्सप्रेस*
*फोंडाघाट महाविद्यालयात ‘महारोजगार मेळावा’ उत्साहात संपन्न*
*102 उमेदवारांची निवड; शेकडो तरुणांना सखोल करिअर मार्गदर्शन*
*फोंडाघाट ः संजना हळदिवे*
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कला व वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग आणि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्याला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाली. व्यासपीठावर जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक आयुक्त श्री. भैय्याजी येरमे, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी सौ. प्रतिभा चव्हाण, संस्थेचे चेअरमन श्री. महेश सावंत, सेक्रेटरी श्री. चंद्रशेखर लिंग्रस, खजिनदार श्री. विठोबा तायशेटे, ज्येष्ठ संचालक श्री. संजय आग्रे,श्री. संदेश सावंत, श्री. आनंद मर्ये, श्री. रंजन चिके, उद्योगपती श्री. दिनेश नारकर, श्री. श्यामसुंदर सावंत, रोजगार अधिकारी निखिल दवणे, तांत्रिक सल्लागार उमेश कुलकर्णी, जिल्हा समन्वयक सिद्धेश घाडीगावकर, वर्षा कासले, स्नेहल पुजारे, प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. सतीश कामत यांनी मेळाव्याच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी पुरेशी नसून कौशल्याधारित शिक्षण अत्यावश्यक झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी त्यांच्या दारी उपलब्ध करून देणे, तसेच उद्योग क्षेत्राशी त्यांचा थेट संपर्क घडवून आणणे हा या मेळाव्याचा मुख्य हेतू आहे. हा मेळावा केवळ रोजगार देणारा उपक्रम नसून, तरुणांना स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ आहे. या संधीचा पुरेपूर उपयोग करून प्रत्येकाने आपल्या आयुष्यात समृद्धी साधावी, आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन त्यांनी आपल्या प्रास्ताविकात केले.
प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेची जाणीव करून दिली. “आजचा विद्यार्थी हा केवळ नोकरी शोधणारा नसून संधी निर्माण करणारा असावा. बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत स्वतःची गुणवत्ता सातत्याने वाढवणे गरजेचे आहे. अशा मेळाव्यांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग क्षेत्राची ओळख होते,” असे ते म्हणाले.
मा. प्रतिभा चव्हाण यांनी शासनाच्या विविध कौशल्य विकास आणि प्रशिक्षण योजनांची सविस्तर माहिती दिली. “राज्य व केंद्र शासन युवकांसाठी अनेक योजना राबवत आहे. या योजनांचा योग्य लाभ घेतल्यास युवकांना स्वावलंबी होता येते. रोजगाराबरोबरच स्वयंरोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
श्री. भैय्याजी येरमे यांनी आपल्या भाषणात रोजगार क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांवर भाष्य केले. “आजच्या काळात पारंपरिक नोकऱ्यांबरोबरच नवीन क्षेत्रे उदयास येत आहेत. डिजिटल कौशल्य, व्यावसायिक प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण शिकण्याची वृत्ती या गोष्टी युवकांनी आत्मसात करणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
ज्येष्ठ संचालक श्री. संजय आग्रे यांनी उद्योग क्षेत्रातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला. “नोकरी मिळवताना केवळ गुणपत्रिका नव्हे, तर व्यक्तिमत्त्व, शिस्त आणि कामाप्रती असलेली निष्ठा महत्त्वाची ठरते. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाला प्राधान्य द्यावे,” असा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन महेश सावंत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. संस्था पुढील काळातही अशा उपक्रमांचे आयोजन करत राहील.”
या मेळाव्यात पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग व गोवा येथील नामांकित आदिराज ग्रुप, बजाज, ॲटमबर्ग, एमआरएफ, मणिपाल बँकिंग, TATA AIA, SBI लाइफ इन्शुरन्स इत्यादी कंपन्यांनी सहभाग घेतला. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी विविध पदांसाठी आवश्यक पात्रता, कौशल्ये आणि करिअरच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करून उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या मेळाव्यात विविध महामंडळाच्या वतीने व्यवसाय मार्गदर्शन व शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
या महारोजगार मेळाव्यातून सुमारे 102 युवक-युवतींची निवड करण्यात आली. त्यातील 25 महाविद्यालयातील विद्यार्थी तर 77 बाहेरील युवक युवतींची निवड करण्यात आली, 50 निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विनोदसिंह पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. बालाजी सुरवसे यांनी करून दिली, तर आभार प्रदर्शन डॉ. बाजीराव डाफळे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

