*कोंकण एक्सप्रेस*
*शक्तीपीठ महामार्ग राधानगरीमार्गे सिंधुदुर्गात उतरवा; संदेश पारकर यांची मागणी*
*कणकवली ः संजना हळदिवे*
नव्याने सुधारित (Revised) होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट राधानगरी परिसराजवळून जात असल्याने, हा महामार्ग राधानगरीमार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उतरवावा, अशी आग्रही मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश पारकर यांनी केली. कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सह्याद्रीच्या पायथ्याशी समांतर मार्गाचा प्रस्ताव
पारकर यांनी सुचवले की, हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ ला जोडला जावा किंवा ग्रीनफिल्ड संकल्पनेनुसार सह्याद्रीच्या पायथ्याशी समांतर मार्ग विकसित करून तो बांद्यापर्यंत नेण्यात यावा. या निर्णयामुळे सह्याद्रीच्या पट्ट्यातील गावांचा विकास होईल आणि स्थानिक पातळीवर आर्थिक दळणवळण व रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रमुख शहरे जोडण्यावर भर
शक्तीपीठ महामार्गाच्या आखणीत कणकवली, ओरोस, कुडाळ आणि सावंतवाडी या मुख्य शहरांना थेट जोडणी मिळणे आवश्यक आहे. जर हा मार्ग प्रस्तावित संकेश्वर-रेड्डी चौपदरीकरण आणि घोटगे-पाटगाव महामार्गाशी जोडला गेला, तर सिंधुदुर्ग ते कोल्हापूर हा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल, असेही त्यांनी नमूद केले.
सिंधुदुर्गच्या हिताला प्राधान्य हवे
सध्याच्या अलाइनमेंटचा फायदा सिंधुदुर्गपेक्षा गोव्याला अधिक होत असल्याचे सांगत पारकर म्हणाले, “हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाचा आहे, त्यामुळे त्याचा प्राथमिक आणि सर्वाधिक फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच व्हायला हवा. राधानगरीमार्गे हा मार्ग आल्यास जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले (सिंधुदुर्ग, विजयदुर्ग), अभयारण्ये (दाजीपूर), आंबोली आणि देवगड-मालवण-वेंगुर्ला किनारपट्टीवरील पर्यटनाला मोठी चालना मिळेल. तसेच कुणकेश्वर, आंगणेवाडी, माणगाव यांसारख्या धार्मिक स्थळांच्या पर्यटनातही वाढ होईल.”

