लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ उत्साहात संपन्न

लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ उत्साहात संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ उत्साहात संपन्न..*

*दोडामार्ग ः शुभम गवस*

येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. चंदन सिन्हा, मा. श्री. परेष व्यास, जेष्ठ पर्यावरण तज्ज्ञ तथा महाविद्यालय विकास समिती सदस्य मा. श्री. राजेंद्र केरकर, जेष्ठ उद्योजक तथा महाविद्यालय विकास समिती सदस्य मा. श्री. विवेकानंद नाईक, माजी प्राचार्य तथा महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ. हेमंत पेडणेकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनिर्माण शिक्षण संस्था, रत्नागिरीचे कार्याध्यक्ष मा. श्री. अभिजित हेगशेट्ये होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व विद्यापीठ गीताने करण्यात आली. त्यानंतर प्राचार्यांनी प्रास्ताविक करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. महाविद्यालयातील विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असून १०० टक्के प्लेसमेंटसाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि करिअर घडविण्यासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगत कॉम्प्युटर व अकाउंटिंगसारखे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली.

मा. श्री. विवेकानंद नाईक यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेऊन नव्या संधी शोधण्याचे आवाहन केले. हॉटेल व सेवा क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. डॉ. हेमंत पेडणेकर यांनी ‘साधन’ आणि ‘साध्य’ यातील फरक समजून घेत विविध क्षेत्रात प्रगती करण्याचा सल्ला दिला. व्यवसाय क्षेत्रातही मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

मा. श्री. राजेंद्र केरकर यांनी विद्यार्थ्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक संधींचा विचार करावा, गोवा परिसरातही विविध क्षेत्रात संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. मा. श्री. चंदन सिन्हा यांनी पदवी प्राप्तीनंतर खरी जीवनपरीक्षा सुरू होत असल्याचे सांगत दृढनिश्चय आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळविता येते, असे मार्गदर्शन केले. मा. श्री. परेष व्यास यांनी शिक्षणाचे जीवनातील महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कु. मानसी गवस, कु. साक्षी गवस व कु. शेषांक गावास यांनी मनोगत व्यक्त करत महाविद्यालयाने घडविलेल्या जडणघडणीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात मा. श्री. अभिजित हेगशेट्ये यांनी संस्थेने दोडामार्ग परिसरात गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविले असून ते विविध क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत असल्याचा अभिमान व्यक्त केला. शिक्षण हे यशाचे खरे साधन असून विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत मूल्येही जपली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. समाजातील द्वेषभावना कमी करण्यासाठी उच्च शिक्षणाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

समारंभात पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दर्शनी कोटकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. आर. एस. इंगळे यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!