*कोकण Express*
*प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन टॅंक आवश्यक – सुशांत दळवी*
कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात आपला विळखा निर्माण करत आहे. विशेषतः ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. उपजिल्हा रुग्णालय किंवा खाजगी रुग्णालये कोविड सेंटर म्हणून वापरण्यात येत आहेत. अशात ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार घेण्यासाठी लोकांची रीघ पहायला मिळत आहे. प्राथमिक उपचार घेत असताना ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणत गैरसोय होत असल्याने आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात कमीत कमी एक तरी भरलेला ऑक्सिजन सिलेंडर ठेवावा अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी यांनी केली आहे.
कोरोनाच्या विळख्यात शहरीभागा सोबत ग्राणीम भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. कोरोना काळात ग्रामीण भागातील जनता ही केवळ प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावर अवलंबून असते. सध्या गावागावात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. शहरीभागात असणारे जिल्हारुग्णालय अथवा खाजगी रुग्णालये तसेच कोविड सेंटर हे रुग्णानी भरलेले आहेत. अचानक ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यास ग्रामीण भागातील रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त असते यासाठी आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र व उपकेंद्र या ठिकाणी तातडीने व्यवस्था करावी काही उपकेंद्रामध्ये ऑक्सिजन सिलेंडर आहेत मात्र ते रिकामी स्थितीत आहेत. अशा सर्व ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांची पाहणी करून भरलेले ऑक्सिजन टँक उपलब्ध करून द्यावेत. यासाठी सर्व ग्रामपंचायत व स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी करून हे टॅंक उपलब्ध करून घ्यावेत अशी विनंती कळसुली विभागातील सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी यांनी केली आहे.