सर्वोत्कृष्ट नवनिर्मिती आणि परिवर्तनाची सर्वोच्च प्रेरणा म्हणजे स्त्री – कोकणी साहित्यिका, सौ. वृंदा कांबळी

सर्वोत्कृष्ट नवनिर्मिती आणि परिवर्तनाची सर्वोच्च प्रेरणा म्हणजे स्त्री – कोकणी साहित्यिका, सौ. वृंदा कांबळी

*कोंकण एक्सप्रेस*

*सर्वोत्कृष्ट नवनिर्मिती आणि परिवर्तनाची सर्वोच्च प्रेरणा म्हणजे स्त्री – कोकणी साहित्यिका, सौ. वृंदा कांबळी*

*मालवण : प्रतिनिधी*

ज्या देशात स्त्रीचा सन्मान होतो, त्या देशाचा विकास होतो. आजही शिक्षण, करिअर, विवाह किंवा वैयक्तिक निर्णय या प्रत्येक क्षेत्रात स्त्रीला स्वतःच्या इच्छेपेक्षा समाजाच्या अपेक्षेनुसार जगावं लागतं. तिला सामाजिक बंधनांमध्ये जखडून न ठेवता “माणूस” म्हणून जगण्याची समान संधी दिली पाहिजे. स्त्री ही केवळ कुटुंबाची नव्हे तर राष्ट्रनिर्मितीची शक्ती आहे. मातृत्व, प्रेम, करुणा त्याग या गुणांनी ती कुटुंबाला जोडून ठेवते, असे उद्बोधन कोकणी साहित्यिका कथा लेखिका तथा सेवानिवृत्त शिक्षिका सौ वृंदा कांबळे यांनी कट्टा संस्थेच्या शैक्षणिक संकुलात आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संचलित वराडकर हायस्कूल कट्टा, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा व डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा चा महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा महिला व बालविकास कार्यालय सिंधुदुर्ग, सखी वन्स स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने गुरुदक्षिणा हॉल कट्टा येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी व्यासपीठावर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, सचिव सुनील नाईक सहसचिव साबाजी गावडे, वराडकर हायस्कूल कट्टाचे. स्कूल कमिटी चेअरमन तथा संचालक सुधिर वराडकर, कट्टा महाविद्यालय विकास समिती सदस्या व स्मिता कॉम्प्युटर कट्टाच्या संचालिका सौ श्रद्धा नाईक, प्रमुख वक्त्या, लेखिका सौ. वृंदा कांबळी, वराडकर हायस्कूल कट्टा च्या मुख्याध्यापिका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. देवयानी गावडे, सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्गच्या ॲड. रूपाली प्रभू, जिल्हा संरक्षण अधिकारी राज गोविंद मडावी,समुपदेशक महेंद्र जाधव, संरक्षण अधिकारी दिपिका सावंत, सहाय्यक संरक्षण अधिकारी, मेघा वजराटकर, कट्टा इंग्लिश मीडियम च्या शिक्षिका सौ वैदही शिरोडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी साहित्य क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल साहित्यिका सौ. वृंदा कांबळी यांचा संस्था सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी आपल्या “अतर्क” या कादंबरीतील “विणा” या पात्राचे आत्मकथन सादर केले.
वराडकर हायस्कूलच्या शिक्षिका सौ. विणा शिरोडकर यांनी प्रास्ताविकेतून कार्यक्रम आयोजनामागचे प्रयोजन व्यक्त केले.
कट्टा संस्था अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी स्त्रियांमध्ये आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य आहे, पण त्यासाठी तिने स्वतः अनेक तणावांचा सामना करताना मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या कणखर असणे गरजेचे आहे असे मत आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले.
कट्टा पंचक्रोशीतील किशोरवयीन व महाविद्यालयीन युवतींना शैक्षणिक व आर्थिक मदत आणि समुपदेशन करणाऱ्या तसेच सामाजिक कार्यात सदैव अमूल्य योगदान देणाऱ्या कट्टा महाविद्यालय च्या विकास समिती सदस्या व स्मिता कंप्युटर कट्टाच्या संचालिका सौ. श्रद्धा नाईक यांच्या शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील दातृत्वाचा गौरव शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन करण्यात आला.
तसेच या दिनाचे औचित्य साधून शिवण कलेतून रोजगार मिळवणाऱ्या सौ. श्रद्धा मुसळे तिरंगा महिला प्रभाग संघ स्टॉल पेंडूरच्या मालकीण सौ. दक्षता भोजणे, आस्वाद फूड च्या सर्वेसर्वा सौ. शुभलक्ष्मी नांदोस्कर, कट्टा येथे खाजगी दुकानात काम करून कुटुंबाचा चरितार्थ चालविणाऱ्या श्रीमती. रेश्मा जांभवडेकर, ओरोस येथील कॅन्टीन व्यावसायिका सौ. करीना शेख, कट्टा, गुरामवाड ग्रामपंचायत सदस्य व कट्टा हायस्कूल कॅन्टीन व्यावसायिका सौ. मयुरी कुबल या सर्व कट्टा पंचक्रोशीतील कर्तुत्वान रणरागिणींच्या कार्य कर्तुत्वाचा गौरव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
महिला सक्षमीकरणासाठी महिलांना शिक्षण,आर्थिक स्वातंत्र्य आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन पुरुषांच्या बरोबरीने हक्क व संधी देणे अपेक्षित आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्री अत्याचाराच्या घटना आजही घडत आहेत, त्या थांबवण्यासाठी कायदे आहेतच परंतु व्यक्तींच्या मानसिकतेत देखील बदल होणे गरजेचे आहे. स्त्रियांनी आपल्या हक्कासाठी व सन्मानासाठी कायद्याचा वापर करून लढले पाहिजे असे मत सखी वन सेंटर च्या ॲड. रूपाली प्रभू यांनी व्यक्त केले.

स्त्री हि त्याग, प्रेम, करुणा व प्रेरणेचे प्रतीक आहे. आई, बहीण, मैत्रीण व पत्नी यासारख्या विविध भूमिकांमधून स्त्री आयुष्याला नवी उमेद मिळते. स्त्री हि कुटुंबाचा केंद्रबिंदू असून तिच्या परिघावर पूर्ण कुटुंब चालत असते, त्यामुळे ती आनंदी असणे गरजेचे आहे असे मत स्मिता कंम्प्युटर कट्टाच्या संचालिका सौ श्रद्धा नाईक यांनी व्यक्त केले.
यावेळी कट्टा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी भारताच्या इतिहासातील प्रेरणादायी रणरागिणींचा वेश परिधान करून त्यांच्या कर्तृत्वाचे व संघर्षमय जीवनाचे दर्शन उपस्थित प्रेक्षकांना घडविले. यासाठी विशेष मेहनत कट्टा महाविद्यालयाच्या महिला विकास प्रमुख प्रा. पौर्णिमा मसूरकर यांनी घेतली.
स्त्री ही शिक्षण व रोजगारामुळे स्वावलंबी होईल, त्यामुळे प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे. लैंगिक विषमता आणि भेदभावाबद्दल जागरूकता वाढवण्याबरोबरच महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्याचा आजचा दिवस आहे असे असे मत कार्यक्रमाच्या अध्यक्षा व वराडकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कट्टा महाविद्यालयाच्या प्रा. कांचन खानोलकर व आभार प्रदर्शन प्रा. श्रुती कुंभार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!