*कोंकण एक्सप्रेस*
*नगराध्यक्षांना रोखणे म्हणजे, सावंतवाडीच्या “संस्कृतीला काळीमा फासण्याचा प्रकार…*
श्रध्दा भोसलेंचे प्रत्युत्तर; पहिल्या पालिका सभेवरून सावंतवाडीत महायुतीत संघर्ष…
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
“मी लोकनियुक्त नगराध्यक्ष आहे. प्रसूती रजेवर असले तरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी लक्ष ठेवून आहे. त्यामुळे आजच्या सभेत मला रोखण्याचा झालेला प्रयत्न हा सावंतवाडीच्या संस्कृतीला काळीमा फासणारा आहे. “असे प्रत्युत्तर सावंतवाडीच्या नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी दिला आहे. दरम्यान मी एका मुलाला जन्म दिला आहे. हे पाप आहे का? असा सवाल करीत त्या ठिकाणी अशा प्रकारे पालिकेच्या सभागृहात एका महिलेचा अपमान होणे, हे योग्य नाही. अशी ही नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.
आज झालेल्या पालिकेच्या सभेत विरोधी गटाचे नगरसेवक संजू परब यांनी भोसले यांच्या ऑनलाइन उपस्थितीला विरोध दर्शवला होता. तसेच त्यांनी एकच नगराध्यक्षांनी सभा घ्यावी, अशी मागणी सभागृहात केली होती. त्यानंतर ऑनलाईन उपस्थित असलेल्या भोसले यांचा पुरवठा खंडित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्या द्वंद्वयुद्ध रंगले आहे.या
बाबत खुद्द नगराध्यक्षांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, प्रसूती रजेवर असतानाही शहराच्या विकासासाठी सक्रिय राहण्याचे वचन मी जनतेला दिले होते, मात्र सभेत काही नगरसेवकांनी त्यांच्या ऑनलाइन सहभागाला विरोध दर्शवला, तो अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रजेवर असलेल्या लोकप्रतिनिधीला ऑनलाइन बैठकीत सहभागी होता येत नाही असा कोणताही नियम अस्तित्वात नाही. आजच्या एआय आणि तंत्रज्ञानाच्या युगात, तसेच कोरोना काळानंतर ऑनलाइन बैठका ही सामान्य बाब झाली असताना, एका महिला लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे रोखणे. हा स्त्री शक्तीचा आणि सावंतवाडीच्या सुसंस्कृत जनतेचा अपमान आहे. आपण कोणत्याही आजारपणामुळे नव्हे तर मातृत्वाच्या रजेवर असूनही कर्तव्याला प्राधान्य देत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडीला जागतिक दर्जाचे पर्यटन शहर बनवण्यासाठी, मुबलक पाणी, स्वच्छता, आरोग्य, रोजगार आणि क्रीडा उपक्रमांना गती देण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून विकासकामे वेगाने पूर्ण करायची आहेत. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून संकुचित मनोवृत्ती सोडून सर्वांनी शहराच्या हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. लवकरच त्या सावंतवाडीत परतणार असून जनतेच्या हितासाठी आपले कार्य अविरत सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

