वैभववाडीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

वैभववाडीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

*कोकण Express*

*वैभववाडीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

आजपासून राज्यसरकारच्या नव्या लॉकडाऊनच्या नियमानुसार ११ वाजता वैद्यकीय सेवा वगळता पोलीस निरीक्षक अतुल जाधव व उपनिरीक्षक प्रविण देसाई यांनी बाजारपेठेतील इतर सर्व दुकाने बंद करण्याच्या व्यापारी वर्गाला सुचना दिल्या आणि बघता बघता काही क्षणातच वैभववाडी बाजारपेठ बंद करण्यात आली. सकाळी ७ ते ११ यावेळेत मात्र बाजारपेठेत ग्राहकांची वेळेअभावी धांदल उडाली. कोरोनाच्या नियमांचे पालन न करता शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची बाजारपेठेतच आरोग्य विभागा मार्फत रॅॅपीड टेस्ट करण्यात येत आहे.
वैभववाडी तालुक्यातील सोनाळी व अन्य काही गावात २९ एप्रिल पर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये २९ तारीख पर्यंत अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था इत्यादी वितरीत करणारे, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांनासह नागरिकांच्या येण्या-जाण्यास प्रवेश बंदी केली आहे.तर संबंधित गावातील अस्थापना व दुकाने बंद राहणार आहेत.या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ व ५८, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ७१,१३९ आणि भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.
डॉ. अनिल पवार यांच्या मते तालुक्यात गेले दोन दिवसात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण संख्या निम्याने कमी झाली आहे. दिगशी गावात सुमारे ९५ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह सापडले होते. सद्यस्थितीत निम्म्याहून अधिक रुग्ण बरे झालेआहेत.तालूक्यातील रुग्ण संख्या कमी होत असून तालुक्यातील महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग समन्वय साधून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करत आहेत. नागरिकांनी लॉकडाऊनच्या व कोरोना संबंधित नियमांचे पालन करुन स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार रामदास झळके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!