“स्थानिक उमेदवार, जनतेची आशा; अनिरुद्ध अविनाश फाटक मणेरीत चर्चेत

“स्थानिक उमेदवार, जनतेची आशा; अनिरुद्ध अविनाश फाटक मणेरीत चर्चेत

*कोंकण एक्सप्रेस*

*“स्थानिक उमेदवार, जनतेची आशा; अनिरुद्ध अविनाश फाटक मणेरीत चर्चेत”*

*दोडामार्ग: शुभम गवस*

मणेरी पंचायत समिती मतदारसंघात सध्या निवडणुकीचे वातावरण रंगू लागले असून विविध उमेदवारांनी आपापल्या प्रचाराला वेग दिला आहे. याच पार्श्वभूमीवर सासोली गावचे विद्यमान उपसरपंच अनिरुद्ध अविनाश फाटक यांनी निवडणुकीच्या मैदानात दमदार एन्ट्री घेतली असून ते सध्या गावोगावी फिरत मतदारांशी थेट संवाद साधत आहेत.
स्थानिक आणि सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार म्हणून अनिरुद्ध फाटक यांची ओळख असून सामान्य जनतेच्या समस्या आणि गरजा जवळून जाणून घेत त्यांनी सामाजिक व स्थानिक पातळीवर काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे मतदारसंघात विशेष लक्ष वेधले जात आहे.
अनिरुद्ध फाटक यांनी उपसरपंच पदावर काम करत असताना गावातील विकासकामे, नागरिकांच्या अडचणी सोडवणे आणि स्थानिक पातळीवर विविध योजना राबविण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी प्रचारादरम्यान मतदारांना सांगितले. त्यांच्या कामाचा अनुभव आणि जनसंपर्काच्या बळावर ते या निवडणुकीत मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सध्या फाटक यांनी सासोलीसह परिसरातील विविध गावांमध्ये दौरे सुरू केले असून घरोघरी जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. तसेच युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत आपल्या विकासाच्या संकल्पना मांडत आहेत. त्यांच्या प्रचाराला काही ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
स्थानिक पातळीवर कार्यरत असलेले कार्यकर्ते आणि समर्थक देखील प्रचारात सक्रिय झाले असून विविध बैठका, भेटीगाठी आणि लहानमोठ्या सभांमधून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे मणेरी पंचायत समिती मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या मतदारसंघात अनेक उमेदवार रिंगणात असल्यामुळे निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अनिरुद्ध अविनाश फाटक यांनी आपल्या कामाच्या जोरावर आणि जनतेच्या पाठिंब्यावर विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांच्या प्रचाराकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!