*कोंकण एक्सप्रेस*
*“नगरपंचायतीत नाकारले, पण क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एन्ट्री”- समीर नलावडे*
*कणकवली ः संजना हळदिवे*
नगरपंचायतीमधून लोकांनी जरी नाकारले तरी क्रिकेट हेच आमचे खरे मैदान असून त्या मैदानात पुन्हा एन्ट्री करता येते, असे मत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी व्यक्त केले. राजकारण हे आज क्रिकेटसारखे झाले असून आपलाच खेळाडू कधी आपल्या पायात चेंडू टाकून विकेट काढेल, असे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र हे सर्व आपण खेळीमेळीच्या भावनेने स्वीकारले पाहिजे. क्रिकेटप्रमाणेच राजकारणातही हार-जीत असते, असे प्रतिपादन त्यांनी केले.
ते सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
जिल्हास्तरीय ४५ वर्षांवरील खेळाडूंची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तसेच ४० वर्षांवरील कै. कांता मेस्त्री स्मृती चषक हौशी क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जाणवली येथील नीलम कंट्री साईडच्या मागील क्रीडांगणावर माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी तुफान फटकेबाजी करत उपस्थितांची दाद मिळवली.
यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक बंडू गांगण, जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल हळदीवे, तालुका हौशी अध्यक्ष प्रा. सत्यवान राणे, जिल्हा हौशी उपाध्यक्ष राजू पेडुरकर, तालुका हौशी सदस्य डी. के. जाधव, जाणवली ग्रामस्थ रविकांत राणे, अनिल राणे, समाजसेवक संजय मालंडकर, राजू वायंगणकर, भाई पावसकर यांच्यासह जिल्ह्यातील हौशी क्रिकेटचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कै. कांता मेस्त्री यांच्या आठवणींना उजाळा देताना समीर नलावडे म्हणाले, “अनिल हळदीवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या मित्राची आठवण जपली, याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. मी स्वतः कांता यांच्यासोबत खूप क्रिकेट खेळलो आहे. सकाळी उठून मोटारसायकलने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात क्रिकेट खेळायला जायचो. अनिल, कांता, बंडू गांगण आणि आमचे सर्व सहकारी यांच्यासोबत खेळल्यामुळेच आजही आम्ही तंदुरुस्त आहोत.”
या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नामवंत संघ दाखल झाले असून स्पर्धेला क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे

