स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे – विजय पांचाळ

स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे – विजय पांचाळ

*कोंकण एक्सप्रेस*

*स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासात सातत्य महत्वाचे – विजय पांचाळ*

*मालवण (प्रतिनिधी)*

स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी मालवण येथील सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.

या कार्यक्रम प्रसंगी तळेबाजार हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नंदन घोगळे, प्रा. दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा.सौ पूर्वा शिरसाट, प्रा. सौ आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना विजय पांचाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शालेय पाठ्यपुस्तकांचे सूक्ष्म वाचन होणे आवश्यक आहे. त्यातूनच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग खुला होतो. स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक विषयातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. या संकल्पना स्पष्ट झाल्या तर अभ्यास करणे सोपे जाते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना अनेक विद्यार्थ्यांना अपयशाला सामोरे जावे लागते. पण अपयशाने खचून जाऊ नका. अभ्यासात सातत्य ठेवून प्रयत्न करत रहा. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व प्रगल्भ होत जाते. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मनापासून स्पर्धा परीक्षांची तयारी करावी, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नागेश कदम यांनी केले तर आभार संग्राम कासले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!