*कोंकण एक्सप्रेस*
*मालवण तालुका गाबीत समाजातर्फे गुणवंतांचा दिमाखदार सत्कार सोहळा संपन्न; डॉ. रत्नाकर कोयंडे व लोकप्रतिनिधींचाही बहुमान*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण तालुका गाबीत समाजाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव समारंभ नुकताच धुरीवाडा येथील ‘संस्कार हॉल’मध्ये अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला गाबीत समाज बांधव आणि भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा
हा सोहळा आरोग्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील भरीव योगदानाबद्दल विशेष गौरविले गेलेले डॉ. रत्नाकर कोयंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. तर प्रमुख पाहुणे म्हणून इंजिनिअर लक्ष्मीकांत खोबरेकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
विशेष सत्कार व लोकप्रतिनिधींचा बहुमान
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले डॉ. रत्नाकर कोयंडे यांचा गाबीत समाजाच्या वतीने विशेष ‘गाबीत सत्कार’ करण्यात आला. याचसोबतीला मालवण नगरपरिषदेत नगरसेवक आणि नगरसेविका म्हणून कार्यरत असलेल्या गाबीत समाजातील आजी-माजी लोकप्रतिनिधींचाही त्यांनी समाजासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून विशेष सत्कार करण्यात आला.
”गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश समाजाचा गौरव वाढवणारे आहे. आगामी काळातही विद्यार्थ्यांनी असेच यश संपादन करून समाजाचे नाव उज्ज्वल करावे,” असे प्रतिपादन मान्यवरांनी आपल्या भाषणात केले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गाबीत समाज मालवण तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला संपूर्ण मालवण तालुक्यातून गाबीत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

