कोकणचा अस्सल ‘रानमेवा’ बाजारात दाखल; पेडावरील अळंबीला खवय्यांकडून मोठी पसंती!

कोकणचा अस्सल ‘रानमेवा’ बाजारात दाखल; पेडावरील अळंबीला खवय्यांकडून मोठी पसंती!

*कोंकण एक्सप्रेस*

*कोकणचा अस्सल ‘रानमेवा’ बाजारात दाखल; पेडावरील अळंबीला खवय्यांकडून मोठी पसंती!*

*कणकवली ः संजना हळदिवे*

कोकणच्या निसर्गाची देणगी असलेला आणि खवय्यांच्या पसंतीचा ‘रानमेवा’ म्हणजेच नैसर्गिक अळंबी (पेडावरील अळंबी) बाजारात दाखल झाली आहे. आषाढी निज ज्येष्ठ अमावस्येचा पारंपरिक मुहूर्त साधून, जंगलात नैसर्गिकरीत्या उगवलेली ही अळंबी कणकवलीच्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जंगलात आणि विशेषतः पेडांवर (झाडांच्या खोडांवर) उगवणाऱ्या या दुर्मीळ अळंबीची चव अत्यंत स्वादिष्ट असते. ही अळंबी विक्रीसाठी धनगर समाजातील महिलांसह स्थानिक विक्रेत्यांनी बाजारपेठेत आणली होती.
खवय्यांची उडाली झुंबड
बाजारात अळंबीच्या वाटीला २०० ते २५० रुपये असा दर लावण्यात आला होता. मात्र, याचे वजन केल्यास ही अळंबी सुमारे १२०० रुपये प्रति किलो या दराने खवय्यांना पडते. एवढा चढ्या दराचा दर असूनही, अस्सल चवीच्या लोभापायी खवय्यांनी या अळंबीला हातभार लावत अल्पावधीतच सगळा साठा संपवला. नैसर्गिक आणि औषधी गुणधर्मांनी युक्त असल्यामुळे या रानभाजीला कोकणात मोठी मागणी असते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!