*कोकण Express*
*कवी अजय कांडर यांचे उद्या व्याख्यान*
*नाशिक पुरोगामी विचार मंचतर्फे आयोजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
नाशिक पुरोगामी विचार मंचतर्फे महात्मा फुले व घटनातज्ञ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त सत्यशोधक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे सातवे पुष्प प्रसिद्ध कवी अजय कांडर गुंफणार असून शनिवार 17 एप्रिल रोजी सायं.स
7 वाजता ‘बाबासाहेब सर्वांचे अर्थात युगानुयुगे तूच ‘ या विषयावर ते व्याख्यान देणार आहेत. ऑनलाइन असणाऱ्या या व्याख्यानाचा लाभ रसिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक पुरोगामी विचार मंचातर्फे दरवर्षी महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी महाराष्ट्रातील विविध विचारवंत, लेखक, कवी यांना निमंत्रित करून व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून बाबासाहेबांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर कवी कांडर यांचे ‘बाबासाहेब सर्वांचे अर्थात युगानुयुगे तूच ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
कवी कांडर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर ‘युगानुयुगे तूच’ ही दीर्घ कविता लिहिली असून ती कविता बहुचर्चित झाली आहे. 14 एप्रिल बाबासाहेबांच्या जयंती दिनी या कवितेवरील नाटक ‘युगानुयुगे तूच’ या नावाने दूरदर्शनवर सादर झाले. विकास तांबे यांची निर्मिती आणि रघुनाथ कदम यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक अभिनेते निलेश पवार यांनी दूरदर्शनवर सादर केले. त्याला महाराष्ट्रातील नाट्य रसिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या सगळ्या पार्श्वभूमीवर तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कवी कांडर यांना या व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती पुरोगामी विचार मंचाच्या व्याख्यानमालेचे संयोजक रविंद्र सुरवसे यांनी दिली असून हे व्याख्यान पुरोगामी विचार मंच या फेसबुक पेजवरही रसिकांना ऐकता येणार आहे.

