*कोंकण एक्सप्रेस*
*जोरदार शक्ती प्रदर्शन करीत शिदेसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल
आमदार दीपक केसरकरांची उपस्थिती*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
सर्वसामान्य कार्यकर्ता जो लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो असे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश गावडे आहेत. ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्यावरच ही निवडणूक लढवली जाईल अशी प्रतिक्रिया आमदार दीपक केसरकर यांनी वेंगुर्ला येथे व्यक्त केली.
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. आमदार दीपक केसरकर यांनी स्वतः मैदानात उतरून नगराध्यक्ष पदासाठी माजी नगरसेवक नागेश उर्फ पिंटू गावडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. सर्वप्रथम ग्रामदैवत श्री रामेश्वर व मारुती स्टॉप येथील मारुती मंदिरात श्रीफळ ठेऊन आशीर्वाद घेण्यात आले. त्यानंतर आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदासाठी माजी नगरसेवक नागेश उर्फ पिंटू गावडे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांच्याकडे दाखल करण्यात आला. यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहरप्रमुख उमेश येरम, सुरेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
सावंतवाडी आणि वेंगुर्लामध्ये नगराध्यक्ष हे निश्चितच शिंदे शिवसेनेचे असतील. त्याचबरोबर दोन्ही ठिकाणी ४२ ही जागांवर आम्ही बाजी मारू. याच कारण म्हणाजे दीपक केसरकर यांनी केलेली विकासकामे. वेंगुर्ल्याचा खरा चेहरामोहरा बदलला आहे याचं खरं कारण म्हणजे सचिन वालावलकर आहेत. मोठमोठ्या विकासकामांना मंजुरी मंत्रालयस्तरावरून वालावलकर यांनी केसरकर यांच्या माध्यमातून आणली. खरा विकास हा शिंदे सेनेच्या माध्यमातूनच झाला असल्याचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सांगितले.
वेंगुर्ला शहरात आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षात विकासात्मक कामात आपण कुठेही कमी नाही. शहरातील दहाही प्रभागात केसरकर यांच्या माध्यमातून प्रचंड निधी देण्यात आला आहे. या भागाचे आमदार दीपकभाई असल्याने भविष्यातही या शहराचा विकास हाच आमचा ध्यास असेल. एक नगराध्यक्ष व २० नगरसेवक पदाचे उमेदवार असे परिपूर्ण पॅनल आम्ही उभे करणार आहोत यात कोणताही वाद होणार नाही याची मला खात्री असल्याचे वालावलकर यांनी सांगितले.
फोटोओळी – आमदार दीपक केसरकर यांनी स्वतः मैदानात उतरून नगराध्यक्ष पदासाठी माजी नगरसेवक नागेश उर्फ पिंटू गावडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

