*कोंकण एक्सप्रेस*
*मालवणसह ९ गावांचा अधिपती असलेल्या नांदरुखच्या गिरोबाचा शुक्रवारी जत्रोत्सव*
*नयनरम्य फटाक्यांच्या आतषबाजीसाठी प्रसिद्ध*
*मालवण : प्रतिनिधी*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि मालवणसह आठ गावांचा अधिपती असलेल्या नांदरुखची ग्रामदेवता गिरोबाचा दहिकाला जत्रोत्सव शुक्रवार दि. ७ नोव्हेंबरला होत आहे. फटाक्यांच्या नयनरम्य आतषबाजीसाठी हा जत्रोत्सव सिंधुदुर्ग जिल्ह्यात नावाजला जातो.
प्राचिन इतिहासानुसार नांदरुख गावची चतुर्सिमा ही मालवणसह देवबाग, तारकर्ली, वायरी, भुतनाथ, कुंभारमाट, घुमडे , आनंदव्हाळ , कातवण अशा पुर्वाश्रमीच्या १२ वाड्यांपर्यंत विस्तारली होती. पण कालोघ्यात अन्य ८ वाड्यांमध्ये आता स्वतंत्र ग्रामपंचायतींसह मालवण नगरपालिका झाली. अद्यापही सागरी किनाऱ्यावर वसलेल्या देवबागसह अन्य गावांतील मच्छिमार रापण संघ मत्सव्यसायात भरभराट व्हावी म्हणून नांदरुखच्या साळकुंभा चाळ्यास सालीना बकर्यांचा भक्ष्य देतात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदूर्ग दुर्ग हा जलदुर्ग बांधताना नांदरुख गावात गिरोबा मंदिरानजिक बांधकाम कामगारांसाठी बाजारपेठ वसवली होती. तर मंदिरासमोर असलेल्या बारमाही तळीचा अभ्यास करून मागिल बाजूस घोड्यांना पाणी पिण्यासाठी तलाव बांधला. महाराजांची घोडेस्वारी नांदरुख गावातून मालवणपर्यंत होत होती.
शिवकालीन इतिहास असलेल्या जत्रोत्सवात रात्रो १० वाजता पलिकडील वाडीतून श्रीच्या पालखीचे फटाक्यांच्या आतषबाजीत पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात आगमन होते. पालखीचे आगमन मंदिरानजिक होताच शोभिवंत फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी करण्यात येते. ती पाहण्यासाठी भाविक आबालवृद्धांची अफाट गर्दी जमते.

