*मिठबावच्या रिक्षावाल्यांची अशीही एक “वर्षा सहल”*

*मिठबावच्या रिक्षावाल्यांची अशीही एक “वर्षा सहल”*

*कोंकण  एक्सप्रेस*

*मिठबावच्या रिक्षावाल्यांची अशीही एक “वर्षा सहल”*

*प्रशांत वाडेकर, देवगड*

देवगड तालुक्यातील मिठबाव येथील रिक्षा चालक मालक संघटनेने एक आगळीवेगळी कृती करत आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीसा विरंगुळा मिळवण्यासाठी “वर्षा सहल”चे आयोजन केले. अध्यक्ष विजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल यशस्वीपणे पार पडली. आपल्या रोजच्या व्यवसायाच्या ताणतणावातून काहीसा मोकळा श्वास घ्यावा, या उद्देशाने काही रिक्षा चालक मित्रांनी सहलीचा प्रस्ताव मांडला. या कल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताच सहलीची दिशा, तारीख आणि स्वरूप ठरले. विशेष म्हणजे इतर वाहनांची मदत न घेता, आपल्या स्वतःच्या रिक्षांमधूनच प्रवास करण्याचा निर्णय घेण्यात आला.
१२ जून रोजी सकाळी रिक्षा व्यवसायिक दिवाकर फाटक, राजू नरे, स्वप्नील नरे, एतराज नरे, लवू शिरवडकर, गणेश लोके, निलेश वायंगणकर, अमोल मिठबावकर, सुभाष चेंदवणकर, नानू फाटक, किरण राजम, संतोष जोगल, तात्या फाटक,सुहास फाटक, प्रतीक जेठे आणि राहुल जेठे या १७ रिक्षाचालकांनी श्री स्वामी समर्थ मिठबाव मठात दर्शन घेऊन आपल्या सहलीला शुभारंभ केला.
सहलीचा पहिला थांबा होता श्री स्वामी समर्थ मठ, हडपीड येथे. तेथे सर्वांनी दर्शन घेतले व छायाचित्रांसह आनंद साजरा केला. त्यानंतर नांदगावमार्गे प्रवास करत सर्व मंडळींनी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मार्लेश्वर गाठले. तेथून पुढे गणपतीपुळे, पावस अशी सहल पुढे सरकली. परतीच्या मार्गावर वाडा विमलेश्वर आणि कुणकेश्वर या आपल्या तालुक्यातील दोन श्रद्धास्थळांना भेट दिली.


या सहलीतून निसर्ग सौंदर्याचा आणि भाविकतेचा मनमुराद अनुभव घेत रिक्षा व्यवसायिकांनी एकमेकांसोबतचे स्नेहबंध अधिक घट्ट केले. “सहली अनेक केल्या, पण आपापल्या रिक्षांमधून एकत्रितपणे केलेली ही पहिली सहल आमच्यासाठी अविस्मरणीय ठरली,” असा आनंद सहभागींनी व्यक्त केला.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे मिठबाव रिक्षा चालक संघटनेने इतरांसमोर एक प्रेरणादायक उदाहरण ठेवले आहे. निसर्गसौंदर्य, धार्मिक स्थळे आणि आपुलकीने भरलेला प्रवास या त्रिवेणी संगमातून ही सहल केवळ एका प्रवासापुरती मर्यादित न राहता, एका स्मरणीय आठवणीच्या रूपात कायमची जपली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!