*कोंकण एक्सप्रेस*
*कोल्हापूरच्या पणदूरकर दाम्पत्याकडून भारतीय संरक्षण निधीसाठी ५ लाखाची देणगी*
*मालवण (प्रतिनिधी)*
भारत – पाकिस्तान यांच्या दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराचे मनोधैर्य व वित्तीय वाढ करून देण्यासाठी कोल्हापुर येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी भूगोल विभाग प्रमुख व ज्येष्ठ विधीज्ञ प्रा. डॉ. रामचंद्र पणदुरकर व त्यांच्या पत्नी सौ. हेमकिरण पणदूरकर यांनी “भारतीय राष्ट्रीय संरक्षण निधी, म्हणजेच नॅशनल डिफेन्स फंड” यासाठी रुपये ५ लाख एवढी देणगी दिली आहे. ही रक्कम पंतप्रधान कार्यालय दिल्ली येथे रवाना करण्यासाठी त्यांनी डॉ. राम पणदुरकर यांच्याकडे धनादेश हस्तांतरित केला. सदर धनादेश पंतप्रधान कार्यालय दिल्ली या ठिकाणी रवाना झालेला असून निधीसाठी दिलेली रक्कम अंडर सेक्रेटरी( फंड्स )पीएमओ, साऊथ ब्लॉक ,नवी दिल्ली येथे पाठविण्यात आली.
यापूर्वी पणदूरकर यांनी शिवाजी विद्यापीठात कमवा व शिका योजनेअंतर्गत, गरीब मुलींच्या अभ्यासिकेची सोय करण्यासाठी रुपये ६० लाख रुपयांची देणगी दिली होती. आणि त्यातून त्यांची दिवंगत कन्या कै. डॉक्टर विद्धिज्ञ रूपाली पणदूरकर अभ्यासिका, बांधून त्याचे उद्घाटन फेब्रुवारी महिन्यात करण्यात आले होते. यापूर्वीही पणदूरकर दांपत्याने अनेक सामाजिक संस्थांना कन्येच्या स्मृती प्रित्यर्थ देणग्या देण्यात आलेल्या आहेत. शिवाय लहान मुलींसाठीही पोस्टातील सुकन्या समृद्धी योजनेतही खाते उघडून काही लहान मुलींसाठी दरवर्षी ठराविक पैसे भरले जातात.
पहलगाम येथे अतिरेकी हल्ल्यात, पर्यटक मारले गेल्यानंतर सैनिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पणदूरकर यांनी पाच लाख रुपयाची देणगी कै. विधिज्ञ डॉक्टर रूपाली पणदूरकर स्मृती प्रित्यर्थ दिली आहे. याबद्दल पणदूरकर यांचे समाजातून कौतुक होत आहे.