समाजाभिमुख कार्य करणाऱ्या काणेकर ट्रस्टचा आदर्श घ्यावा : मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे प्रतिपादन

समाजाभिमुख कार्य करणाऱ्या काणेकर ट्रस्टचा आदर्श घ्यावा : मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे प्रतिपादन

*कोंकण एक्सप्रेस*

*समाजाभिमुख कार्य करणाऱ्या काणेकर ट्रस्टचा आदर्श घ्यावा : मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे प्रतिपादन*

*कणकवलीत कला तपस्वी आप्पा काणेकर ट्रस्टचा कै.सौ.उमा काणेकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न*

*कणकवली ः प्रतिनिधी*

गेली १४ वर्षे कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक उपक्रमांतून समाजासमोर नवा आदर्श उभा करत आहे. दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने कै. सौ. उमा काणेकर स्मृतिप्रीत्यर्थ विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन आणि स्पर्धा परीक्षेत गुणवत्ताधारक विद्यार्थांचा प्रोत्साहनपर सत्कार सोहळ्याचे आयोजन करत आहे. ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. आज अशा सेवाभावी संस्थांनी सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेऊन समाजाचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कणकवली नगर पंचायतच्या मुख्याधिकारी श्रीमती गौरी पाटील यांनी केले. कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट च्या पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या.

येथील नगरवाचनालयाच्या सभागृहात कलातपस्वी आप्पा काणेकर ट्रस्टचा कै.उमा काणेकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आनंद अंधारी, ज्येष्ठ साहित्यिक बाबुराव शिरसाट, ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष महेश काणेकर, कार्याध्यक्ष प्रशांत काणेकर, विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीमती पाटील पुढे म्हणाल्या की,आज सर्वच क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे. प्रत्येक जण नव्या तंत्रज्ञानाच्या युगात वावरत आहे. आधुनिक युगाला सामोरे जाताना माणसाने आपली सामाजिक कृतज्ञतेची नाळ कधीही तोडता कामा नये. माणुसकीचे नाते वृद्धिंगत करण्यासाठी माणसामाणसा मधील सुसंवाद वाढायला हवा.आणि हे काम काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट अशा समाजाभिमुख कार्यातून पुढे नेत आहे. हा आदर्श इतर संस्थांनी घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

काणेकर चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष महेश काणेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. आणि आपल्या प्रास्ताविकात ट्रस्टची निर्मिती आणि उद्देश स्पष्ट केला. आजच्या युगात माणूस पुस्तकांपासून दूर होत आहे. यासाठी वाचनसंस्कृती वाढावी यासाठी विविध उपक्रमांतून नव्या पिढीला वाचन समृध्दी साठी प्रयत्नशील राहण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमचे आजोबा आप्पा काणेकर उत्तम कलावंत आणि चित्रकार होते.त्याकाळात त्यांनी अनेकांना कलेची प्रेरणा दिली होती. त्यांच्या स्मृती जिवंत राहाव्यात यासाठी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक, साहित्यिक, कलावंत, शिक्षक, उद्योजक, यांच्या कार्याचा योग्य सन्मान करण्याचा आमचा मानस आहे.त्यांच्या कार्याची प्रेरणा समाजाला मिळावी आणि समाजोन्नतीचे कार्य सतत घडत रहावे. हाच एकमेव उद्देश आहे. तसेच पत्नी उमा काणेकर ही एक उपक्रमशील आदर्श शिक्षिका होती. तिचे शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम होते.परंतु तिच्या अकाली निधनानंतर तिच्या कार्याची स्मृती चिरंतन टिकून राहावी यासाठी तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन आदर्शवत शिक्षिकांचा गौरव करत आहोत असे मनोगत श्री.काणेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केले.

यावेळी या सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक बाबुराव शिरसाट म्हणाले की, कला तपस्वी आप्पा काणेकर ट्रस्टचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील काम कौतुकास्पद आहे. कोकणातील विविध क्षेत्रातील रत्नांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याचा यथायोग्य सन्मान केल्यामुळे त्यांना उर्जा देण्याचे काम करत आहे .आप्पा काणेकर व उमा काणेकर यांनी कला आणि शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम केले. काणेकर ट्रस्टने अशीच उत्तरोत्तर प्रगती करून सामाजिक व शैक्षणिक कार्याची व्याप्ती वाढावावी, अशा आशावाद श्री. शिरसाट यांनी व्यक्त केला. मालवणी कवी दादा मडकईकर यांनी ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करत एक मालवणी कविता सादर करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी कै. सौ. उमा काणेकर स्मृती उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार वंदना राणे व आदर्श शिक्षिका पुरस्कार नेहा राणे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कला तपस्वी आप्पा काणेकर स्मृृती पुरस्कार मालवणी बोलीभाषा पुरस्कार कवी दादा मडकईकर, दशावतार लोकसंगीत सेवा पुरस्कार सिद्धेश कलिंगण, समाजभूषण पुरस्कार सागर शिंदे, साहित्य कला सेवा पुरस्कार अभिनेते प्रमोद कोंडये, व्यक्तीमत्त्व विकास प्रेरणा पुरस्कार सदाशिव पांचाळ, कलागौरव पुरस्कार रांगोळीकार समीर चांदरकर, हिरकणी प्रेरणा पुरस्कार नम्रता इंगळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच विशेष सद् भावना सन्मान तबालवादक गिरीश कामत, सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर, लोककला सेवा प्रा. हरिभाऊ भिसे, ट्रॅक सिंगर, मूर्तीकार, चित्रकार संदेश रावले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सर्व सन्मानमूर्तींना काणेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सन्मानचिन्ह, ग्रंथभेट देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आनंद अंधारी वयाची नव्वदी ओलांडूनही या वयात आपली सामाजिक कृतज्ञता जपत पत्रकारिता आणि सामाजिक जाणीव जपताहेत हा त्यांच्या आजवरच्या कार्याचा आदर्श नव्या पिढीला प्रेरणादायी ठरवा यासाठी कृतज्ञतापूर्वक त्यांच्या कार्याची दखल घेऊन ट्रस्ट च्या वतीने सत्कार करण्यात आला. श्री. अंधारी यांनीही आपल्या मनोगतातून ट्रस्टच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी पुरस्कारर्त्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी कै. सौ. उमा काणेकर स्मृती आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्यामुळे आमची जबाबदारी वाढली असून यापुढील काळात शैक्षणिक क्षेत्रात आम्ही चांगली कामगिरी करू, असा आशावाद वंदना राणे आणि नेहा राणे यांनी व्यक्त केला. या सन्मान सोहळ्याचे औचित्य साधून कला गौरव पुरस्कार प्राप्त कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी कलारसिकांसाठी खास आपल्या निवडक चित्रांचे प्रदर्शन मांडले होते. रसिकांनी त्यांच्या चित्रांची वाहवा केली. त्यांची कन्या बालचित्रकार श्रेया चांदरकर हिने रंगीत धाग्यांच्या सहाय्याने विणलेली छत्रपती शिवाजीमहाराज यांची कलाकृती विशेष लक्षवेधक होती. तिचाही विशेष सत्कार करण्यात आला.
ट्रस्टतर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. कणकवली शहर परिसरातील शाळांमधील ३० मुला-मुलींचा गुणगौरव करण्यात आला. संपूर्ण सोहळ्याचे प्रवाही सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. आभार प्रदर्शन कल्पना मलये यांनी केले. हा पुरस्कार वितरण सोहळा यशस्वी होण्यासाठी ट्रस्टच्या कार्यकारिणी व सदस्यांनी मेहनत घेतली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!