*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळच्या कवठी गावात युवकाचा खून*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
कुडाळ तालुक्यातील कवठी अन्नशांतवाडी येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संदिप उर्फ बाळा दामोदर करलकर (वय-५२) या युवकाचा राहत्या घरातच खून करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची टीम रवाना झाली आहे. गावात पोलिसांकडुन खुन्ह्याचा तपास सुरू असून खुनाचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कुडाळ तालुक्यातील कवठी अन्नशांतवाडी ही अतिदुर्गम भागात वसलेली वाडी आहे. दहा ते बारा घरे असलेली ही छोटीशी वाडी असून या वाडीत संदिप करलकर आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता. अलीकडे वडिलांचे निधन झाल्यानंतर त्याच्या आईला अपंगत्वाचा झटका आल्यामुळे वडिलांचे दिवस कार्य आटोपल्यानंतर मयत संदीप करलकर यांच्या छोट्या भावाने आपल्या आईला उपचारासाठी मुंबईला नेले होते. त्यामुळे मयत संदीप करलकर एकटाच घरी राहत होता. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती. त्याचा कुटुंबातील सदस्यांना सुद्धा त्रास होत होता. दरम्यान, शुक्रवारी संदीप करलकरचा खून झाल्याचा फोन निवती व कुडाळ पोलीसांना गेला. त्या माहितीच्या आधारे निवती व कुडाळ पोलीसांनी तात्काळ कवठी येथील अन्नशांतवाडी येथे धाव घेतली. तत्पूर्वी संदीप करलकर यांचा मुंबई येथे नोकरीनिमित्त राहत असलेला भाऊ संतोष करलकर आपल्या आईचे आधारकार्ड घेऊन जाण्यासाठी आपल्या पुतण्यासमवेत घरी आला. तो घरी येतातच त्याला हा झाला प्रकार निदर्शनास आला. त्याच दरम्यान पोलिसांची टिमही मयत संदीप करलकर यांच्या घरी दाखल झाली. घरातील समोरच्या व्हरांड्यात रक्तबंबाळ अवस्थेत संदिप करलकरचा मृतदेह पडला होता. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. तसेच घटनास्थळी दुर्गंधी सुटली होती. पोलिसांनी प्राथमिक तपासणी सुरू केली असून हा खुनच असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान खुन्ह्याचा अद्याप तपास लागला नाही तरी लवकरच त्या खुन्यापर्यंत आम्ही पोहचू असे उपविभागीय पोलिस अधिकारी कांबळे यांनी सांगितले. मयत संदिप करलकर यांच्या पश्चात आई, भाऊ, पुतण्या असा परिवार आहे

