*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ल्यात ९ फेब्रुवारीला दशावतार अभिनय, लंगार नृत्य स्पर्धा*
*वेंगुर्ले : प्रतिनिधी*
दुसऱ्या अखिल भारतीय दशावतारी नाट्य संमेलनाचे औचित्य साधून अखिल दशावतार नाट्य संस्था सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थांच्यावतीने दशावतार अभिनय, दशावतार बाजातील गायन व दशातारातील लंगार नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वेंगुर्ल्यात ९ फेब्रुवारीला आयोजित केलेल्या दुसऱ्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनात या स्पर्धा होतील.
येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात ९ रोजी सकाळी ९.०० वाजता दशावतार बाजातील गायन स्पर्धा होणार आहे.या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या सादरीकरणाचा २ मिनीटांचा व्हिडीओ पाठवावा, यातील २० स्पर्धकांची निवड अंतिम स्पर्धेसाठी करण्यात येणात आहे.अंतिम फेरीतील प्रत्यक्ष सादरीकरणासाठी प्रत्येक स्पर्धकाला प्रत्यक्ष सादरीकरणासाठी ३ मिनिटांचा वेळ देण्यात येईल.
सकाळी ११.०० वाजता शालेय गटासाठी दशावतार अभिनय स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या अभिनयाचा २ मिनिटांचा व्हिडिओ ६ फेबुवारीपर्यंत आयोजकांकडे पाठविणे अत्याश्यक आहे.आलेल्या व्हिडिओमधून केवळ २० स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी होणार आहे.अभिनय सादरीकरण कमाल ३ मिनिटांचे असावे. त्यानंतर ११.३० वाजता लंगार नृत्य स्पर्धा होणार आहे.ही स्पर्धाही शालेय गटासाठी होणार आहे. सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या मुलांनी ६ फेब्रुवारी पूर्वी नावनोंदणी करणे अत्यावश्यक आहे. अभिनय व गायन स्पर्धेसाठी स्पर्धकांनी ९४२१२३८०५३ या क्रमांकावर आपले सादरीकरणाचे व्हिडिओ पाठवावेत. लंगार नृत्य स्पर्धेतील स्पर्धकांनीही याच नंबरवर संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठानचे सचिव प्रा. डॉ. सचिन परुळकर यांनी केले आहे.

