*कोंकण एक्सप्रेस*
*सावंतवाडीच्या राजघराण्याकडून २३ ते २६ ला दशावतार महोत्सव : युवराज लखमराजेंची माहिती*
*उद्घाटनाला मंत्री आशिष शेलारांची उपस्थिती*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालय आणि राजघराणे यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथील राजवाड्यात २३ ते २६ जानेवारी २०२५ या काळात दशावतार महोत्सव आयोजित करण्यात आले आहे.यात सात दशावतार मंडळे सादरीकरण करणार आहेत.विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे औचित्य साधुन सावंतवाडी राजघराण्यातील होवून गेलेल्या राण्यांचा जीवनप्रवास भरतनाट्यम मधून सादर करण्यात येणार आहे,अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी दिली.
या महोत्सवाच्या उद्घाटनाला माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्री आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. दशावतार कलेला राजाश्रय मिळावा यासाठी हा उपक्रम सलग तिसऱ्या वर्षी राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक दशावतार मंडळांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्तात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य दिलीप भारमल, शाम सावंत, दिलीप गोडकर, गणेश मर्गज, जयप्रकाश सावंत आदी उपस्थित होते. दरम्यान दररोज सायंकाळी ६.३० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत दिड तासाची दोन दशावतार नाट्यप्रयोग सादर केले जाणार आहेत. यामध्ये २३ जानेवारीला कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ यांचा ‘विधी संख्येत’ तसेच जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ यांचा ‘नारायणी नमोस्तुते’ हा नाट्य प्रयोग होणार आहे. २४ जानेवारीला नाईक मोचेमाडकर यांचा ‘राखणदार’ तसेच दत्तमाऊली दशावतार मंडळ यांचा ‘देवी चंद्रलांबा परमेश्वरी’ हा प्रयोग होणार आहे. २५ जानेवारीला चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ यांचा ‘गिधाड घुबड संग्राम’ तर श्री सिद्धेश्वर पारंपारिक दशावतार मंडळाचा ‘विजयमणी’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. संस्थेच्या विश्वस्त युवराज्ञी सौ. श्रध्दाराजे भोंसले यांच्या संकल्पनेतून २६ जानेवारीला भरत नाट्यम नृत्यांगना अॅकॅडेमी ऑफ फाईन आर्ट, मुंबई यांचा सावंतवाडी ‘अष्टनायिका’ हा भरतनाट्यम कार्यक्रम सादर केला जाणार आहे. यामध्ये सावंतवाडी राजघराण्याच्या राण्यांच्या भावनात्मक संघर्षाचा वेध घेतला जाणार आहे. राजघराण्यातील स्त्रियांना वारसा व परंपरा राखून प्रेम, कर्तव्य व सहनशक्तीच्या सीमा पार कराव्या लागल्या. त्यांचा जीवनसंघर्ष व पराक्रम या भरतनाट्यम प्रयोगातून सादर केला जाणार आहे. तसेच चेंदवणकर गोरे दशावतार नाट्यमंडळ यांचा मुंबईची ‘मुंबादेवी’ हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. भरतनाट्यम हा एक तासाचा नृत्याविष्कार असून सर्व दशावतार नाट्यप्रयोग दिड तासाचे असणार आहेत. तरी कला प्रेमींनी या लोककला महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन युवराज लखमसावंत भोंसले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी केले आहे.