दिविजा वृद्धाश्रमातील आगळा-वेगळा शाही थाटातील तुलसी विवाह सोहळा

दिविजा वृद्धाश्रमातील आगळा-वेगळा शाही थाटातील तुलसी विवाह सोहळा

*कोकण Express*

*दिविजा वृद्धाश्रमातील आगळा-वेगळा शाही थाटातील तुलसी विवाह सोहळा*

*सर्व पारंपारिक विवाह पद्धतींचा समावेश*

*कणकवली : प्रतिनिधी* 

कणकवली तालुक्यातील असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित दिविजा वृद्धाश्रमात तुलसी विवाहाचा आगळा वेगळा शाही कार्यक्रम थाटात संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांनी साजरा केला. हा सण साजरा करण्यामागचा हेतू असा आहे कि वृद्धाश्रमातील आजी आजोबांना लग्न सोहळ्याचा आनंद घेता यावा व ज्या आजोबांचे तारुण्लयात लग्न झाले नाही अशा आजोबांना आपल्या उतार वयात लग्न सोहळ्याचा आस्वाद घेता यावा म्हणून हा सोहळा दरवर्षी थाटात साजरा केला जातो. पारंपारिक सर्व पद्धती यावेळी केल्या जातात.

दिविजा वृद्धाश्रमातील आजोबा पांडुरंग (वय ६५) हे अविवाहित असल्याने त्यांना लग्न सोहळ्याचा आनंद देण्यासाठी भोवल्यावर उभे केले गेले. तत्पूर्वी तांदूळ निवडण्याचा पारंपारिक कार्यक्रम आश्रमातील सातोसे आजी, विजया आजी यांच्या सुस्वर आवाजात ओव्या म्हणत पार पडला. आश्रमातील कर्मचारी सौ प्रतीक्षा सावंत यांनी त्यांना ओव्या म्हणण्यास साथ दिली. तांदूळ निवडून झाल्यानंतर आश्रमातील सर्व आजी आजोबांनी पांडुरंग आजोबांना हळद चढवली सर्व आजी व कर्मचार्यांना पिवळ्या साड्या नेसवून हळदीचा कार्यक्रम थाटामाटात साजरा केला.

पिवळ्या साड्यांनी आश्रमातील वातावरण पूर्णत: हळदीमय झाले होते. हळद झाल्यानंतर निम सांढण्याचा सर्व कर्मचार्यांनी व आजी आजोबांनी हळदीच्या गाण्यावर नृत्य चालू केले. आश्रमातील आजी श्रीमती रोहिता व शुभांगी यांनी तर हळद लागली या गाण्यावर एकच ठेका घेतला. आजोबांची करवली म्हणून महिला कर्मचारी कुमारी सायली तांबे हिने आजोबांसाठी करा धरला तर सौ अस्मि हिने तळी धरली. श्री पांडुरंग आजोबा यांना नटून थटून कार्यक्रम मंडपात आणले गेले. त्यानंतर पुण्यवचनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आश्रमातील महिला कर्मचारी श्री व सौ अनुजा आचरेकर यांनी आजोबांचे पुण्यवचन केले. या पुण्यवचनाला नवऱ्याचा धेडा म्हणून श्री गोपीनाथ यांनी आपली भूमिका बजावली.

श्री शंतनू गुरुजींनी गणेश पूजन करून पुण्यवचन सुरु केले. सर्व आजीनी घाणे भरण्याचा कार्यक्रम व कर्मचाऱ्यांर्नी आहेर देण्याचा कार्यक्रम केला. कर्मचारी सौ दीप्ती, मंजिरी, सुनिता, अर्चना, प्रमिला, कु अश्विनी यांनी पुण्यवचनात वरास आहेर केला. पुण्यवचन झाल्यावर मुहूर्ताची वेळ जवळ आली होती. आश्रमातील कर्मचारी श्री कोकरे व श्री समीर यांनी आजोबांच्या कपड्याची तयारी व मेकअप करून चीरतरुणासारखे मांडवात आणले. तदनंतर तुलसी मायची करवली म्हणून कुमारी अश्विनी हिने नवरदेवाला रुखवत देऊन स्वत:चा मान घेतला. आश्रमातील कर्मचारी सौ सानिया यांनी तळी ओवाळून औक्षण केले. मानाने पाय धुवून वाजत गाजत नवरदेवास मांडवात आणले. खऱ्या खुर्या लग्नासारखा मांडव श्री महादेव व इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने उभा केला होता. तुलसी नव वधूसारखी हिरव्या साडीने नटवली होती. सनई चौघडे चारही बाजूने घणघणत होते.

सायंकाळी शंतनू गुरुजींनी मंगलाष्टकांना सुरुवात केली. तद नंतर आश्रमातील महिला कर्मचारी सौ भारती यांनी सुस्वर आवाजात मंगलाष्टकांना सुरुवात केली. भारतीचा उत्साह पाहून आश्रमातील आजी शोभना, चंपा, बेबी, वनिता यांनीही सुर धरला. अखेरची मंगलाष्टक श्री समीर यांनी गायिले व शुभमंगल सावधान होताच सनई चौघड्यांचे सुर दुमदुमले व सर्व आजी आजोबांनी अक्षता टाकून नवदामपत्यास शुभ आशीर्वाद दिले. तुलसी विवाहमुळे कुरमुरे व उसाची उधळण करून प्रसाद म्हणून कुरमुऱ्याचे वाटप करण्यात आले. अगदी खऱ्याखुऱ्या लग्न सोहळ्या प्रमाणे हा तुलसी विवाह दिविजा वृद्धाश्रमात पार पाडला.

आश्रमाचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांनी याबाबत असे सांगितले की, एवढ्या सगळ्या शारीरिक दृष्ट्या थकलेल्या आजी आजोबांना प्रत्यक्ष लग्न सोहळ्याला नेणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना वर्षातून एकदा लग्न सोहळ्याचा आनंद घेता यावा याकरिता तुलसी विवाहाचे औचित्य साधून दिविजा वृद्धाश्रमात एक आगळा वेगळा लग्न सोहळा साजरा केला जातो.

या लग्न सोहळ्याकरिता संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्ये, अविनाश फाटक, सौ साधना तेलतुंबडे, श्रीम संध्या गायकवाड, सौ योजना परब, किरण नारायणकर, संजय ढवण ही मंडळी मुंबईहून खास लग्न सोहळ्यासाठी हजर झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!