*कोकण Express*
*कणकवली मतदारसंघातील बीएसएनएलच्या समस्या सुटणार !*
*आमदार नितेश राणे यांची बीएसएनएलचे महाराष्ट्र, गोवा हेड रोहित शर्मा यांच्याशी बैठक*
*7 ऑक्टोबर रोजी कणकवली प्रहार भवन येथे समस्या जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीएसएनएल च्या नेटवर्क समस्येबाबत सातत्याने जनतेमधून संताप व्यक्त केला जात असताना ही समस्या सोडविण्याच्या दृष्टीने बीएसएनएलचे महाराष्ट्र व गोवाचे प्रमुख रोहित शर्मा यांच्याशी भेट घेत आमदार नितेश राणे यांनी चर्चा • केली. या बैठकीमध्ये कणकवली मतदारसंघातील कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यांमध्ये बीएसएनएलच्या असलेल्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये बीएसएनएलचे नव्याने उभारले जाणारे टॉवर, किंवा यापूर्वी उभारणी करण्यात आलेल्या टॉवर ची कनेक्टिव्हिटी सुरू करण्यात आली नसल्याबाबत देखील चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी या सर्व प्रश्नी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता कणकवली, देवगड, वैभववाडी मधील सरपंचांशी व त्यांच्या गावात बीएसएनएल नेटवर्क मध्ये येणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी कोल्हापूर वरून श्री. पाटील या अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी शर्मा यांनी दिली आहे. त्यांच्या माध्यमातून बीएसएनएल च्या नेटवर्क समस्येबाबत प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.