*कोंकण एक्सप्रेस*
*नशामुक्त सिंधुदुर्गसाठी पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी!
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही*
*पालकमंत्री नितेश राणे*
*सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी*
“सिंधुदुर्गातील प्रत्येक विद्यार्थी ही जिल्ह्याची खरी संपत्ती आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण रोजगार, शिक्षण आणि विकासाच्या संधी निर्माण करीत असताना अमली पदार्थांचे संकट त्यांच्या आयुष्यावर काळी छाया टाकत असेल, तर विकासाची सर्व स्वप्ने अपूर्ण राहतील. त्यामुळे नशामुक्त सिंधुदुर्ग ही केवळ मोहीम नसून जिल्ह्याच्या भवितव्याशी निगडित चळवळ आहे,” यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी असे भावनिक आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नशामुक्त सिंधुदुर्ग’ अभियानाच्या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे उपस्थित होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी तृप्ती धोड मिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अनंत डवंगे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा साईल, सौ सुप्रिया वालावलकर यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत अमली पदार्थ, ऑनलाईन गेमिंग आणि व्यसनाधीनतेच्या वाढत्या धोक्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. या कार्यक्रमात स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नितेश राणे म्हणाले, “आज येथे उपस्थित असलेला प्रत्येक विद्यार्थी हा आमच्या आशा-आकांक्षांचा केंद्रबिंदू आहे. जिल्ह्याला विकसित करण्याचे स्वप्न पूर्ण करताना तरुण पिढी सक्षम आणि सुदृढ असणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यसनमुक्त समाज निर्माण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”
यावेळी त्यांनी पोलिस प्रशासनालाही स्पष्ट आणि कठोर संदेश दिला. “पोलिस दलाने इच्छाशक्ती दाखवली तर जिल्ह्यात एकही ड्रग्सचा कण प्रवेश करू शकत नाही. सिंधुदुर्गात अमली पदार्थ कोणत्या मार्गाने येतात, त्यामागे कोण आहेत, याची माहिती यंत्रणेकडे असते. त्यामुळे केवळ जनजागृती करून चालणार नाही, तर ड्रग्स पुरवठ्याच्या साखळीवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
“झिरो टॉलरन्स टू ड्रग्स हीच आमची भूमिका आहे. मटका, जुगार, अमली पदार्थ किंवा समाजघातक कोणतीही प्रवृत्ती सिंधुदुर्गात खपवून घेतली जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या आड जो कोणी येईल, त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई होणे आवश्यक आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.
अमली पदार्थांबरोबरच ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनावरही त्यांनी बोट ठेवले. “अनेक विद्यार्थी मोबाईलच्या आहारी जात असून ऑनलाईन गेमिंगमुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. काही वेळा या व्यसनामुळे मानसिक तणाव वाढून आत्महत्येसारखे टोकाचे प्रकारही घडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून स्वतःचे भविष्य घडविण्यावर भर द्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना नशामुक्त समाज उभारणीची शपथ देण्यात आली. “आपण सर्वांनी प्रामाणिकपणे ही जबाबदारी स्वीकारली आणि आपल्या परिसरात व्यसनमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी योगदान दिले, तर सिंधुदुर्ग देशातील पहिला नशामुक्त जिल्हा म्हणून ओळखला जाईल,” असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

