पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना: पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू*

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना: पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू*

*कोंकण एक्सप्रेस*

*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना: पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू*

*पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात १० शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप*

शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांना कर्जमाफी देऊन दिलासा देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे. या योजनेनुसार कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांना आता अधिकृतपणे ‘थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र’ वाटप करण्याच्या मोहिमेचा जिल्हा स्तरावर औपचारिक शुभारंभ करण्यात आला आहे. यामुळे संबंधित शेतकरी आता कर्जमुक्त होऊन पुढील हंगामासाठी नव्या जोमाने कृषी कर्ज मिळवण्यास पात्र ठरणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकाटे, जिल्हा उपनिबंधक प्रदिप मालगावे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात १० पात्र शेतकऱ्यांना थकबाकी नसल्याच्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या शुभारंभ कार्यक्रमास जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, सहकार व कृषी विभागाचे प्रतिनिधी, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते. जिल्ह्यातील उर्वरित सर्व पात्र लाभार्थ्यांना संबंधित गावस्तरीय सोसायट्या आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने ही थकबाकी नसल्याची प्रमाणपत्रे लवकरच वितरित केली जातील, अशी माहिती यावेळी जिल्हा उपनिबंधक प्रदिप मालगावे यांनी दिली.

जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पहिल्या टप्प्यात १ हजार ५६९ शेतकऱ्यांना ७ कोटी ७७ लाख ९८ हजार ६४४ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर त्यांनाही पुढील टप्प्यात लाभ वितरित करण्यात येणार आहे. उर्वरीत शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!