*कोकण Express*
*जगाला अहिंसा व सत्याचरणाचा संदेश देणारे महामानव म्हणजे म.गांधी: अरुण मर्गज*
“संपूर्ण जगाला अहिंसा, सत्य व सत्याग्रह यांचा आपल्या आचरणातून संदेश देणारे महामानव म्हणजे म.गांधीजी होत.शस्त्रसज्ज बलाढय इंग्रजी सत्तेविरुद्ध अहिंसेच्या मार्गाने लढूनच आपण स्वातंत्र्य मिळवू शकतो; हे ओळखून म.गांधीनी अहिंसात्मक मार्गाने लढा दिला.आणि रक्तपात न करताही शत्रूला नामोहरम करता येते, हे संपूर्ण जगाला दाखविले.अशांच्या विचारांचा जयंती, स्मृती दिनानिमित्ताने जागर करून त्याचे अनुकरण केले पाहिजे”असे उद्गार प्रा.अरुण मर्गज यांनी काढले.ते बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध अभ्यासक्रमाच्या वतीने आयोजित म.गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करताना बोलत होते.
त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “महात्मा गांधींची विचारधारा व त्यांनी मांडलेला व जगाने स्वीकारलेला गांधीवाद ज्यांना समजेल त्यांनां खऱ्या अर्थाने मानवतावाद कळेल. जगाला आदर्शभूत असणाऱ्या महान व्यक्तीचे आपण वारसदार आहोत; ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. यासाठी गांधी समजून घ्या व लालबहादूर शास्त्रींसारखी साधी रहाणी व उच्च विचारसरणी अंगीकारा असा संदेशही दिला.
प्रा. नितीन बांबर्डेकर यांनी “महात्मा गांधी यांना समजून घेण्यासाठी अधिकृत ऑथेंटिक पुस्तक वाचा. त्यांची विचारसरणी समजून घ्या. कपोकल्पित गोष्टीच्या आधारे कोणत्याही महान नेत्याबद्दल मत तयार करू नका .तो त्या राष्ट्रपुरुषांचा अपमान ठरेल .आजही जगभरामध्ये महात्मा गांधींना आदर्शभूत मानून त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन आपलं जीवन आचरण करणारे थोर नेते आहेत. आजही जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी गांधीवाद किती उपयुक्त ठरू शकतो यावर जगभरामध्ये संशोधन चालू आहे. यातच या या महान नेत्यांचे महानपण आहे. अशा थोर नेत्यांचे जीवन आदर्शभूत मानून त्याप्रमाणे समाजासाठी जनसेवेसाठी जे जे आणि जेवढे जेवढे म्हणून कार्य करता येईल ते करण्यासाठी आपण वचनबद्ध होऊया. असे सांगत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला अभिवादन केले .
सर्वांनी दोन मिनिटं स्तब्धता पळून आदरांजली अर्पण केली. *(त्यानंतर महाविद्यालय, शिक्षण संस्थेच्या परिसराची विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली व आपली स्वच्छता आपल्या हाती, स्वच्छता ही जनसेवा हा संदेश दिला.)*
यावेळी बॅ.नाथ पै ज्यु.कॉलेजचे प्राचार्य अर्जुन सातोस्कर, मंदार जोशी, पूजा मेस्त्री, बी.एडच्या प्रा. मेघा पवार व विद्यार्थी उपस्थित होते.

