*कोंकण Express*
*दुर्धर आजाराने ग्रासलेल्या देवगडच्या स्वप्निलला मदतीची गरज…*
*यकृत निकामी झाल्याने अनेक शारीरिक व्याधी; दानशुरांनी पुढे येण्याची गरज…*
*देवगड : प्रतिनिधी*
एकीकडे स्वतःच्या आजारावरील खर्च तर दुसरीकडे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता त्यातच अंथरुणाला खिळलेले आयुष्य अशा अनेक संकटांना तोंड देत स्वप्निल सुरेश मालाडकर हा ३२ वर्षीय तरुण आपले जीवन जगत आहे. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी जडलेल्या एका दुर्धर आजाराशी त्याची गेली सात वर्षे झुंज सुरू आहे. यकृत निकामी आणि नाभीचा हर्निया त्यातच रक्त कमी होऊन हृदयाकडे रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी होणे, अशा अनेक शारीरिक व्याधींचा तो सामना करत आहे. आजाराचे निदान काहीच नाही, मात्र केवळ उपचारावर जगायचे, असा हृदय हेलावून टाकणारा जीवन प्रवास त्याच्या नशिबी आला आहे. दरम्यान वडिलांचे छत्र हरपल्याने आणि घरात दुसरा करता पुरुष कोणीच नसल्यामुळे स्वप्निलच्या कुटुंबाला उदरनिर्वाहाची मोठी चिंता निर्माण झाली आहे. त्यातच दर दिवशी घ्यावे लागणारे महागडे उपचार आता स्वप्निलच्या कुटुंबीयांना पेलवत नाही, त्यामुळे दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदतीचा हात द्यावा, अशी कळकळीची हाक स्वप्नीलच्या नातेवाईकांनी दिली आहे. तर शासनाकडून सुद्धा एखादी मदत मिळवून देण्यासाठी समाजातून प्रयत्न व्हावेत, असे आवाहनही केले जात आहे.
मूळ देवगड तलुक्यातील तांबळडेग दक्षिणवाडा येथील व सध्या मुंबई- डोंबिवली येथे राहणाऱ्या स्वप्नीलच्या नशिबात वेदनेचे काटे नियतीने प्रत्येक पावलावर विखरून ठेवले आहेत. यकृताचा दुर्मिळ आजार अन् नाभीच्या हर्नियामुळे यकृतच निकामी! हृदयाकडे जाणाऱ्या रक्त वाहिन्या बारीक झाल्याने रक्ताच्या गाठी अन् रक्त पातळ करून हृदयापर्यंत पोहोचविण्यासाठी सतत इंजेक्शन व औषधे अशा वेदनादायी आयुष्याशी संघर्ष करून जीवन व्यथित करणाऱ्या स्वप्नीलला आता समाजमनाच्या आधाराची गरज आहे. कारण, उपचारासाठीचा खर्च त्याला व त्याच्या कुटुंबाला पेलवणे आता शक्य नाही. स्वप्निलला वयाच्या २५ व्या वर्षी हा दुर्मिळ आजार जडला. तेव्हापासून तो आज सात त्या आजाराची आपली झुंज देत आहे. त्याला सुरुवातीला पोटामध्ये भयंकर वेदना होत होत्या. काही खाल्ल्यास उलट्या व सतत खोकला सुरू व्हायचा. रक्त कमी झाल्याने त्याचे शरीर पांढरे होत होते. नोव्हेंबर २०१६ साली तो मुलुंडच्या एका खाजगी हॉस्पीटलमध्ये दाखल झाला. तेथे सात दिवसांच्या औषधोपचारात सतत `पेनकिलर’सह विविध औषधे सुरू होती. परंतु, पोटातील भयंकर वेदना थांबत नव्हत्या. त्याच्या `स्लीन’ची (spleen) ची साईज सतत कमी- जास्त होत होती. त्यामुळे डॉक्टरांनी `बोन मॅरो’पासून (bone marrow) संपूर्ण शरीराच्या टेस्ट केल्या. त्यानंतर त्याला रक्त पातळ होण्याची व इतर औषधे नियमित सुरू ठेवण्यास सांगितली. वेळोवळी शरीर तपासणी, ब्लड टेस्ट, सोनोग्राफी करण्यास सांगितले. सुमारे दहा माहिने त्याने त्या हॉिस्पटलमध्ये `ट्रीटमेंट’ घेतली. मात्र, खर्चाच्या दृष्टीने त्याने शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याचा निर्णय घेतला.
ऑगस्ट २०१७ मध्ये स्वप्नीलने केईएम हॉस्पिटलमध्ये तपासणी करून घेतली. `इंडोस्कोपी’नंतर डॉक्टरांनी त्याला ईव्हीएल बॅडींग (Evl banding) करण्यास सांगितले. ही उपचार पद्धती सहा महिने सुरू होती. ज्या तपासण्या मुलुंडच्या हॉस्पिटलमध्ये केल्या होत्या, त्या पुन्हा कराव्या लागल्या. याचदरम्यान केईएमच्या डॉक्टरांनी त्याची रक्त पातळ होण्याची औषधे बंद केली. कालांतराने यकृतामध्ये पाणी होऊ लागल्याने ते पाणी बाहेर काढण्यासाठी औषधे सुरू करण्यात आली.
डिसेंबर २०१७ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर स्वप्नीलवर मानसिक, शारीरिक अन् आर्थिक संकटही ओढवले. वडिलांच्या निधनामुळे कुटुंबाची जबाबदारी घेण्यास स्वप्नील हा आजारामुळे असमर्थ होता. यातच मानसिक ताण आल्याने त्याने तीन- चार महिने स्वतःवरील औषधोपचार बंद ठेवले. यात त्याची तब्बेत अधिकच खालावत गेली. नातेवाईकांनी त्याला सायन आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे पुन्हा तपासण्या झाल्या. रक्त कमी झाल्याने दोन बाटल्या रक्त चढविण्यात आले. तर पोटात जास्त प्रमाणात पाणी (33 लीटर) जमा झाल्याने ते आयुर्वेदिक पद्धतीने काढण्यात आले.
एप्रिल २०१८ मध्ये `फॅमिली’ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार त्याने जसलोक हॉस्पिटलमध्ये घेण्याचा निर्णय घेतला. तेथील डॉक्टरांनी त्याला पुन्हा रक्त पातळ होण्याची व इतर औषधे नियमित सुरू ठेवण्यास सांगितली. दरम्यान, लॉकडाऊनमुळे ट्रीटमेंट पूर्णतः बंद झाली. २०१६ मध्ये त्याची पोर्टल व्हेन ६ मिमी होती, ती २०१८मध्ये ५ मिमी झाली.२०२०मध्ये उपचाराअभावी ४ मिमी झाली. पुढे ट्रीटमेन्ट न मिळाल्यास पोर्टल व्हेन पूर्णतः थ्रोबोस होऊन बंद होईल अन् त्याच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.
स्वप्नीलने २०१८ पासून दिव्यांग सर्टिफिकेटसाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, त्याला जडलेला आजार दिव्यांग`कॅटेगरी’मध्ये येत नसल्याचे कारण देत सर्टिफिकेट नाकारण्यात आले. स्वप्नीलचे औषधोपचार नियमित सुरू राहिल्यास व त्याला योग्य हायप्रोटीन डाएट मिळाल्यास तो आजाराशी लढू शकतो. त्याचे संपूर्ण जीवन आता पूर्णतः औषधावरच अवलंबून आहे. पोटामध्ये रक्ताच्या गाठी होत असल्याने त्या वितळविण्यासाठी दररोज रक्त पातळ करण्याची इंजेक्शन त्याला घ्यावी लागतात.
स्वप्नीलच्या शरीरात नवे रक्त तयार होत नाही त्याला दर तीन महिन्यांनी रक्तवाढीसाठी `आयर्न’चे इंजेक्शन घ्यावे लागते. बॉटलमधून रक्त चढविता येत नाही. त्यामुळे त्याला `हिपेटाईटिस बी’ व `हिपेटाईटिस सी’ होण्याची शक्यता आहे. स्वनीलचा ब्लड ग्रुपही `ए- निगेटीव्ह’ हा दुर्मिळ असल्याने त्याला रक्तही तात्काळ उपलब्ध होत नाही. तीन महिन्यातून एकदा सोनोग्राफी डॉपलर, सहा महिन्यातून एकदा पोटाचे सीटीस्कॅन, नियमित ब्लड टेस्ट कराव्या लागतात. हायप्रोटीन डाएट, लो- सोडियम डाएट अशी अनेक पथ्य असली तरी त्याचा जुना आजार तसाच राहणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे स्वनील सांगतो.
पोटात तयार होणारे पाणी काढण्यासाठी औषधे, पोट साफ होण्यासाठी औषधे, प्रेशरमुळे फुगणाऱया शरीरातील नसा कंट्रोल करण्यासाठीसुद्धा औषधे स्वनीलला घ्यावी लागतात. यकृत हे प्रोटीन बनवत नसल्याने हाय-प्रोटीन डाएट, तर मिठामुळे पोटात पाणी तयार होत असल्याने लो-सोडियम डाएट घ्यावा लागतो. हर्नियाच्या सर्जरीला आठ महिने पूर्ण झाले असून डॉक्टरांनी सांगितलेला हाय-प्रोटीन डाएट परिस्थिती हलाखीची असल्याने स्वप्नीलला घेता येत नाही. त्यामुळे त्याच्या तब्येतीमध्ये काहीच सुधारणा होत नाही. वजनही वाढत नाही. यकृत सुरळीत काम करीत नसल्याने तब्येतीच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत. औषधे घेतल्यावर या सगळय़ा व्याधीना कंट्रोलमध्ये ठेवणे शक्य होणार आहे.
स्वप्नीलच्या शरीरातील यकृताकडून हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या नसा अतिशय बारीक झाल्याने रक्त पुरवठय़ाच्या कार्यात अडथळा निर्माण झालेला आहे. वारंवार पोट फुगणे, हातापायावर सूज येणे, लाल चट्टा पडून मोठे फोड येणे, चक्कर येणे, उलटीतुन रक्त पडणे, डोक्याला मुंग्या येणे, दोन्ही हातापायाला `क्रॅम्स’ येणे, चालताना तोल जाणे अशा अनेक गोष्टींचा सामना स्वप्नील करत आहे. १००/६० असा रक्तदाब व ५.७ हिमोग्लोबीन! वजन खूप कमी झाल्याने त्याला अशक्तपणा जाणवतो. या आजारामुळे शरीरातील शुद्ध रक्त हृदयापर्यंत जात नसल्याने यकृताचे कार्यही बिघडले आहे.
या आजारावरील वैद्यकीय उपचाराच्या मदतीसाठी स्वप्नीलने शासकीय योजनांसाठी सरकारी कार्यालये, सेवाभावी संस्थाकडे स्वतः पायपीट केली. मात्र, त्याला कोणतीही मदत मिळाली नाही. या आजारावरील मदतीसाठी कोणत्याही सरकारी योजनेमध्ये तरतुद नसल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडूनही स्वप्नीलला मदत उपलब्ध होऊ शकली नाहि.
स्वप्नील हा आपल्या दुर्मिळ व दुर्धर आजाराशी लढतो आहे. त्याला जगायचं आहे. त्यासाठी समाजातील दात्यांच्या आणि शासनाच्या मदतीची त्याला गरज आहे. शासनाने त्याला विशेष बाब म्हणून त्यांच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी घेण्याची गरज असून लोकप्रतिनिधीनी देखील त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आर्थिक मदतीसाठी बँक तपशीलः- स्वप्नील सुरेश मालाडकर, खाते क्र. 68017087944 (बँक ऑफ महाराष्ट्र, शाखाः कांजूरमार्ग पश्चिम) IFsc code- MAHB0000397 किंवा Gpay no. 9969077089 या क्रमांकावर समाजातील दानशूर दात्यांनी मदत जमा करावी, असे आवाहन त्याच्या कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.

