शाळांना नवसंजीवनी; पटसंख्येचे निकष शिथिल केल्याने शाळा वाचवा मंचाकडून स्वागत!

शाळांना नवसंजीवनी; पटसंख्येचे निकष शिथिल केल्याने शाळा वाचवा मंचाकडून स्वागत!

*कोंकण एक्सप्रेस*

*शाळांना नवसंजीवनी; पटसंख्येचे निकष शिथिल केल्याने शाळा वाचवा मंचाकडून स्वागत!*

*६ वी ते ८ वीच्या वर्गांनाही सवलत देण्याची शासनाकडे मागणी!*

*सिंधुदुर्ग/रत्नागिरी*

१५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयामुळे कोकणातील माध्यमिक शाळा बंद पडण्याच्या उंबरठ्यावर होत्या. मात्र, ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ मंचाने दिलेल्या लढ्याला यश आले असून, शासनाने पटसंख्येचे निकष शिथिल केल्यामुळे शेकडो शाळा बंद होण्यापासून वाचल्या आहेत. या निर्णयाचे शैक्षणिक क्षेत्रातून स्वागत होत असून, मंचाने या निर्णयासाठी पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत. दुर्गम भाग आणि भौगोलिक परिस्थितीमुळे कोकणातील शाळांची पटसंख्या कमी आहे. नवीन नियमांमुळे अनेक शाळा बंद होण्याच्या भीतीखाली होत्या. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी ‘एकही शाळा बंद पडू देणार नाही,” असा शब्द दिला होता. तो शब्द पाळत ९ वी आणि १० वीच्या वर्गांसाठी २० विद्यार्थ्यांचा निकष लागू करण्यात आला आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित झाले आहे.

याकामी रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत आणि शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचेही खंबीर सहकार्य लाभले. शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करतानाच ‘शाळा वाचवा मंचा’ने दोन प्रमुख मागण्या शासनासमोर ठेवल्या. माध्यमिक शाळांना जोडलेल्या ६ वी ते ८ वीच्या वर्गांनाही २० च्या पटसंख्येचा निकष लागू करावा, जेणेकरून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम राहील. तसेच हा निर्णय केवळ तात्पुरता मर्यादित न ठेवता, कोकणची भौगोलिक परिस्थिती आणि दुर्गमता लक्षात घेऊन कायमस्वरूपी लागू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

आमच्या पिढ्या घडवणाऱ्या या शाळा म्हणजे केवळ इमारती नसून आमची संस्कृती आहे. शासनाने उर्वरित मागण्यांचाही सकारात्मक विचार करावा, अशी भावना मंचाचे अध्यक्ष संजय वेतुरेकर, समन्वयक कमलाकांत कुबल आणि सचिव महेश पाटोळे यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!