खरीप हंगामासाठी प्रशासनाने सज्ज राहावे; शेतकऱ्यांना खते-बियाणे वेळेत द्यावे

खरीप हंगामासाठी प्रशासनाने सज्ज राहावे; शेतकऱ्यांना खते-बियाणे वेळेत द्यावे

*कोंकण एक्सप्रेस*

*खरीप हंगामासाठी प्रशासनाने सज्ज राहावे; शेतकऱ्यांना खते-बियाणे वेळेत द्यावे*

 *मंत्री नितेश राणे*

*मुंबई, दि. १४ :*

शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि शेतीविषयक मार्गदर्शन वेळेत उपलब्ध होण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करावे तसेच खरीप हंगामात कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मत्स्य विकास आणि बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

मंत्रालयातील दालनातून दृश्य संवाद प्रणालीद्वारे कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यातील खरीप हंगाम २०२६ संदर्भातील आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, कृषी अधीक्षक तसेच संबंधित तीनही तालुक्यांतील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. राणे यांनी हवामान विभागाने एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली असल्याचा उल्लेख करत शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करण्याचे आवाहन केले. कमी पावसाच्या परिस्थितीत घाईने पेरणी करू नये तसेच कृषी विभागाच्या सूचनांनुसारच पेरणी करावी, असे त्यांनी सांगितले.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागासह सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना देत शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते आणि कृषी औषधांच्या उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये याची विशेष काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात उपलब्ध असलेला खत व बियाण्यांचा साठा योग्य नियोजनाद्वारे प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात यावा, असेही ते म्हणाले. तसेच लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या समस्यांची गांभीर्याने दखल घेण्याच्या सूचना देत अवकाळी पावसामुळे फळबागांचे नुकसान झाल्यास तातडीने पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

पावसाचे प्रमाण, कृषी औषधांचा साठा, बियाण्यांची उपलब्धता, माती नमुने तपासणी तसेच खरीप हंगामासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा सविस्तर आढावा यावेळी त्यांनी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!