*कोकण Express*
*मुंबई गोवा महामार्गाची बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण २६ ऑगस्ट रोजी करणार पाहणी*
*आमदार वैभव नाईक, आ. नितेश राणे यांनी वेधले विविध प्रश्नी लक्ष; मुंबईत आज झाली महत्त्वपूर्ण बैठक*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
गणेश चतुर्थीच्या पूर्वी मुंबई गोवा महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करा, असे आदेश देत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी २६ ऑगस्ट रोजी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्याचे आश्वासन आज मुंबईत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत दिले अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
मुंबईत सह्याद्री अतिथी गृहामध्ये आज सोमवारी सकाळी कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी, खासदार सुनील तटकरे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार शेखर निकम, आदिती तटकरे, अनिकेत तटकरे, श्री. साळुंखे, सचिव रस्ते, मुख्य अभियंता, सा. बांधकाम, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता छाया नाईक, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, आर.टी. ओ. अधिकारी आदी उपस्थित होते.
गणेश चतुर्थी कालावधीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थे बाबत ही तातडीने बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी आमदार वैभव नाईक यांनी गगनबावडा घाट रस्त्याच्या वारंवार निर्माण होणाऱ्या समस्येबाबत लक्ष वेधले. महामार्गाच्या पूर्ण कामांकडेही त्यांनी लक्ष वेधले. तर आमदार नितेश राणे यांनी भुईबावडा, गगनबावडा घाट वारंवार कोसळत असल्याने बंद होणारे रस्ते यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्याची मागणी केली. महामार्गाच्या प्रलंबित कमा बाबत लक्ष वेधत तसेच ज्या ठिकाणी महामार्गावर अपघात सदृश्य जागा आहेत त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी वाहनधारकांना सूचना मिळण्याकरिता ब्लींकर्स लावण्याची ही मागणी करण्यात आली. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणातील या सर्वच लोकप्रतिनिधींच्या सूचनाबाबत तात्काळ गांभीर्याने उपाययोजना करण्याची आदेश दिल्याची माहिती श्री. नाईक यांनी दिली.

