75 फुटी ध्वजस्तंभाचा गोवर्धन सर्वांच्या सहभागाने पेलला – प्रांताधिकारी वैशाली राजमाने

75 फुटी ध्वजस्तंभाचा गोवर्धन सर्वांच्या सहभागाने पेलला – प्रांताधिकारी वैशाली राजमाने

*कोकण Express*

*75 फुटी ध्वजस्तंभाचा गोवर्धन सर्वांच्या सहभागाने पेलला – प्रांताधिकारी वैशाली राजमाने*

जिल्ह्यात एकमेव उभारलेल्या 75 फुटी ध्वज स्तंभाचा गोवर्धन तहसीलदार रमेश पवार यांनी जरी उचलला तरी येथील नागरिकांनी आणि संस्थांनी त्याला लावलेला हात यामुळे तो यशस्वीरित्या पेलला गेला असे उदगार कणकवलीच्या प्रांताधिकारी सौ वैशाली राजमाने यांनी काढले .
दिनांक ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या सप्ताहात कणकवली तहसीलदार कार्यालयातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचा सांगता समारंभ दि०१७ ऑगस्ट रोजी कणकवली तहसील कार्यालयामध्ये मान्यवर व संपूर्ण कार्यक्रमात योगदान दिलेल्या संस्थांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत तशाच दिमाखदार स्वरूपात संपन्न झाला . या कार्यक्रमात राजमाने बोलत होत्या .
शासनाकडून प्राप्त सूचनांप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळ्याचा उत्सव प्रांताधिकारी वैशाली राजमाने आणि तहसिलदार रमेश पवार यांच्या पुढाकाराने कणकवली परिसरातील वेगवेगळ्या संस्थांच्या सहभागाने संपन्न झाला .यानिमित्ताने आयोजित उपक्रम आणि स्पर्धांची जबाबदारी “आम्ही कणकवलीकर “, कणकवली व्यापारी संघ, रोटरी क्लब कणकवली सेंट्रल, स्नेह-सिंधु कृषि पदवीधर संघ , कनक रायडर्स आणि इतर काही संस्थांनी जबाबदारी घेतली होती . १५ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक ९.०५ वा. प्रांताधिकारी सौ. वैशाली राजमाने यांचे हस्ते तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या जिल्ह्यातील सर्वांत उंच , ७५ फूटी ध्वजस्तंभावर शासकीय ध्वजारोहण व ध्वजवंदन संपन्न झाले .या सर्व कार्यक्रमात ज्या संस्थानी आणि स्पर्धकांनी सहभाग घेतला , बक्षिसे मिळवली. अशा सर्वच घटकांप्रती आभार व्यक्त करण्यासाठी आणि कौतुक करण्यासाठी १७ ऑगस्ट रोजी तहसिलदार कार्यालयात प्रमाणपत्र, रोख पारितोषिक आणि स्मृतीचिन्ह वितरण व कौतुक सोहळा प्रांताधिकारी सौ. वैशाली राजमाने व तहसीलदार रमेश पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मोठ्या संख्येने नागरीक यासाठी उपस्थित होते. या उत्सव कार्यक्रमात संपूर्ण सहकार्य केल्याबद्दल विद्यामंदिर प्रशाला , एस एम हायस्कूल , कणकवली कॉलेज आणि कै. सौ. इंगेट्राउट नाईक अध्यापक विद्यालय तसेच विविध संस्था यांचा सुदधा सत्कार करण्यात आला . कौतुक सोहळ्याची समाप्ती कै. सौ. इंगेट्राउट नाईक अध्यापक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या भारतमातेच्या नृत्याविष्काराने झाली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक करंबेळकर यांनी केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!